कुडाळ एसटी आगाराच्या बहुतांशी फेर्‍या रद्द

0

कुडाळ : कुडाळ एसटी आगाराने गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी सोमवारी ग्रामीण भागात जाणार्‍या बहुतांशी गाड्यांच्या फेर्‍या रद्द केल्याने प्रवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. यात मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. दरम्यान सकाळच्या सत्रातील बर्‍याच गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशी आक्रमक झाले.याबाबत संतप्त प्रवाशांनी एसटी प्रशासनाला जाब विचारला. गणेशोत्सवानिमित्‍त मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी गावी दाखल झाले आहेत. शिवाय स्थानिक नागरिकांचीही शहराच्या ठिकाणी ये-जा असते. गणेश चतुर्थीच्या अगोदर दोन दिवसांपूर्वीच कुडाळ एसटी आगाराचे वेळापत्रक कोलमडले. याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागला असतानाच सोमवारी चतुर्थीदिवशी ग्रामीण भागात एकाच मार्गावर लागोपाठ धावणार्‍या बहुतांशी गाड्यांच्या फेर्‍या अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. चतुर्थीच्या पहिल्या दिवशीपर्यंत मुंबईकर चाकरमानी गावी दाखल होतात. तसेच स्थानिकांचीही सकाळच्या व सायंकाळच्या सत्रात बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी गर्दी होते. मात्र, कुडाळ आगाराने ग्रामीण भागातील गाड्यांच्या बहुतांशी फेर्‍या रद्द केल्याने नागरिकांची गैरसोय झाली. जुन्या बसस्थानकावर याबाबत कोणतीही सूचना लावण्यात आलेली नसल्याने प्रवासीवर्ग अधिक आक्रमक झाला. ग्रामीण भागात जाणार्‍या बहुतांशी गाड्या सुटल्याच नसल्याने या गावातील प्रवाशांनी सकाळच्या सत्रात आक्रमक पवित्रा घेत एसटी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. मात्र, दरवर्षीप्रमाणे एकाच मार्गावरील लागोपाठ जाणार्‍या काही गाड्यांच्या फेर्‍या बंद ठेवण्यात आल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. प्रवाशांनी एसटी प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र रोष व्यक्‍त केला. ग्रामीण भाग तसेच मालवण व अन्य ठिकाणी जाणार्‍या काही गाड्या रद्द केल्याने प्रवाशांनी खासगी वाहनांचा आधार घेत प्रवास केला. यात त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. याबाबत कुडाळ आगार प्रशासनाशी संपर्क साधला असता गणेश चतुर्थी दिवशी प्रवाशी मिळत नसल्याने दरवर्षी पहिल्या दिवशी एकाच मार्गावर तास दीड तास वेळेनुसार लागोपाठ धावणार्‍या गाड्यांपैकी काही फेर्‍या बंद ठेवण्यात येतात. कुडाळ आगारातून दर दिवशी 14 हजार 700 कि.मी गाड्यांच्या फेर्‍या होतात. यापैकी  सोमवारी गणेश चतुर्थी दिवशी 5 हजार 700 कि.मी.च्या फेर्‍या रद्द  करण्यात आल्या आहेत. मंगळवारपासून सर्व फेर्‍या पूर्ववत होणार आहेत, असे सांगण्यात आले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here