सर्व न्यायालये एकाच आवारात येणार?

0

रत्नागिरी : रत्नागिरीतील विखुरलेली विविध न्यायालये एकाच ठिकाणी कार्यरत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नूतन न्यायालय इमारतीची कामे तसेच जुन्या न्यायालय इमारतीची दुरूस्ती पूर्ण झाल्यानंतर विखुरलेल्या न्यायालयांचे कामकाज याच ठिकाणी चालू शकणार आहे. गोगटे कॉलेजजवळील न्यायालयाच्या आवारात नवीन न्यायालय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 31 ऑक्टोबर रोजी नूतन इमारतीचा ताबा विधी विभागाकडे सुपूर्द होण्याची शक्यता आहे. शहरातील गोगटे कॉलेजजवळ जिल्हा न्यायालय आहे. याच परिसरातील विस्तारित न्यायालय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्याचबरोबर जुन्या इमारतीची दुरूस्ती व इतर कामे प्रगतीपथावर आहेत. प्रधान जिल्हा न्यायाधीश आर. एन. जोशी यांनी काही महिन्यांपूर्वी कार्यभार स्वीकारल्यानंतर संथ गतीने सुरू असलेल्या कामांना गती आणली. अंतर्गत रस्ते, पार्कींग, कमानी आदी कामे पाठपुरावा करत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूर्ण करून घेतली.अर्धवट स्थितीत असलेली कामे आणि गुणवत्तापूर्ण नसलेल्या कामांवर बोट ठेवत ती पुन्हा चांगल्या पद्धतीने करून घेतली. त्यासाठी संबंधित विभागांच्या वेळोवेळी बैठका घेऊन 31 ऑक्टोबरपर्यंत नूतन इमारत ताब्यात मिळाली पाहिजे अशा सक्‍त सूचनाही केल्या. त्यानुसार संबंधित यंत्रणा कामाला लागल्या. अजूनही प्रधान जिल्हा न्यायाधीश जोशी स्वत: जातीने सुरू असलेल्या कामांवर लक्ष ठेवून असतात. रत्नागिरीत विखुरलेली न्यायालये येथील मुख्य न्यायालय आवारात कार्यरत करण्याचा त्यांचा मानस असल्याचे यातून दिसून येत आहे. शहरातील प्रमुख न्यायालय इमारतींमध्ये फौजदारी आणि दिवाणी न्यायालयांचे कामकाज चालते. मात्र कामगार न्यायालय, बाल न्यायालय अशी काही न्यायालये वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली आहेत. जनतेला एकाच ठिकाणी कायद्याचा आधार मिळून होणारी फरपट थांबावी यासाठी लहान-मोठी सर्व न्यायालये एकाच ठिकाणी कार्यरत करण्याचा विचार सुरू आहे. त्याद‍ृष्टीने नूतन न्यायालय इमारतीची आणि आवारातील राहिलेली सर्व कामे 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून नवीन इमारत ताब्यात देण्यास प्रधान जिल्हा न्यायाधीशांकडून सुचित करण्यात आले आहे.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here