विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभाग सज्ज

0

सिंधुदुर्गनगरी : लोकसभेची निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत.गणेश चतुर्थीनंतर विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.या पार्श्‍वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाने जोरदार तयारी सुरू केली आहे. 15 ते 20 सप्टेंबर या दरम्यान विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनीही आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीसाठी निवडणूक विभागही सज्ज झाला असून लोकसभेला वापरण्यात आलेली मतदार यंत्र मोकळी करून ती विधानसभेसाठी सज्ज करण्याचे काम निवडणूक विभागामार्फत युद्धपातळीवर सुरू झाले आहे. सध्याच्या विधानसभेला ऑक्टोबर महिन्यात पाच वर्षे पूर्ण होत असल्याने आता नवीन विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे सर्वांनाच वेध लागले आहेत. राजकीय पक्षांनी तर आपल्या मोर्चेबांधणीस गेल्या सहा महिन्यापासून सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील तीन मतदारसंघांपैकी कुडाळ-मालवण मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आ.वैभव नाईक यांनी आपल्या प्रचाराचा धडाका निवडणुकीपूर्वीच लावला आहे. तर सावंतवाडी मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तर भाजपाचे राजन तेली यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. देवगड मतदारसंघातही विद्यमान आमदार नितेश राणे यांनी तयारी सुरू केली आहे. मात्र, ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढविणार हे अजुन निश्‍चित झालेले नाही. दरम्यान तिन्ही मतदारसंघात इतर पक्षांच्यावतीने कुणी तयारी करताना दिसत नाही. देवगड कणकवली मतदारसंघात भाजपाचे युवा नेते संदेश पारकर तसेच अतुल रावराणे प्रयत्न करत असताना दिसत आहेत. मात्र, काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षांच्या माध्यमातून या निवडणुकीसाठी कोणतीही मोर्चेबांधणी होताना दिसून येत नाही. त्याचबरोबर राज्यात युती होणार की नाही? याबाबतही संभ्रम असल्याने निश्‍चित उमेदवारी कोणाला मिळेल? हाही प्रश्‍न इच्छुक उमेदवारांच्या समोर आहे.त्यामुळे सर्वच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here