रत्नागिरी : कोकण रेल्वेने चाकरमान्यांसाठी खास गणेशोत्सवादरम्यान चांगली व्यवस्था केली. मात्र, अनेक गाड्या चार ते पाच तास उशिराने धावल्यामुळे गणपती घरात विराजमान झाले तरी चाकरमानी गाड्यांमध्ये बसून घरी जाण्याची वाट पाहत होते. चाकरमान्यांचे दिवसभर चांगलेच हाल झाले. दरवर्षी लाखोंच्या संख्येने चाकरमानी रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये दाखल होतात. रत्नागिरी जिल्ह्यात एस.टी. महामंडळाने तब्बल 1700 पेक्षा अधिक गाड्या सोडल्या. या गाड्याही कमीच पडल्या. दरवर्षीची गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे व मध्यरेल्वेनेही गाड्यांची संख्या, डबे यांची वाढ केली होती. राज्यराणी, कोकणकन्यांच्या डब्यांची संख्या वाढवली. त्याचप्रमाणे गणपती स्पेशल गाड्याही सोडण्यात आल्या होता. मात्र, गेले दोन-तीन दिवस कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांचे प्रमाण वाढल्याने आणि पावसामुळे गाड्यांचे वेग थोडा मंदावला होता. त्याचा परिणाम ट्रेन चार ते पाच तास उशिराने धावत होता. रविवारी दिवसभरात हजारो चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले. सोमवारी रात्री सुटलेल्या ट्रेन सकाळी नियमित वेळेत दाखल झाल्या नव्हत्या. रत्नागिरीमध्ये येईपर्यंत काही ट्रेनला दोन अडीच तास उशीर झाला होता. कोकणकन्या अडीच तास तर राज्यराणी एक्स्प्रेसही तेवढाच वेळ उशिराने धावत होती. नेत्रावती एक्स्प्रेस सहा तास उशिराने धावत होती. जादा गाड्याही उशिराने धावत होत्या. त्यामुळे चाकरमानी रत्नागिरी, लांजा, राजापूर व सिंधुदूर्गमधील स्थानकांवर पोहचेपर्यंत गणपती बाप्पा घरी विराजमान झाले होते. गावातील नातेवाईकही मोबाईलवर संपर्क साधत चाकरमान्यांची विचारपूस करताना दिसत होते. गणरायाच्या आगमनावर पावसाचे सावट असल्याने काही भक्तगणांनी पावसाने विश्रांती घेतल्यावर गणरायाची मिरवणूक काढली. ग्रामीण भागामध्ये चाकरमानी घरात दाखल झाल्यानंतर गणरायाची मूर्ती आणण्यात आली. सिंधुदूर्गमध्ये मात्र चाकरमानी पोहचेपर्यंत दुपार उलटून गेली होती.
