नवी मुंबई/पनवेल : उरण येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटला लागलेल्या भीषण आगीत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सीआयएसएफ अग्निशमन दलाचे ३ जवान आणि एक ओएनजीसीच्या एका कामगाराचा समावेश आहे. प्लांटमध्ये आणखीही काही लोक अडकून पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. उरणच्या ओएनजीसी प्रकल्पाला आज सकाळी ७.२० वाजता भीषण आग लागली. या आगीत तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. या आगीचा मोठा भडका उडाला आणि सगळीकडे धुराचे लोट पसरले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. या आगीच्या पार्श्वभूमीवर उरण शहरातील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. एक किलोमीटरवर येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. समुद्रकिनारीच हा प्रकल्प असल्याने प्रकल्पाजवळील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या प्रकल्पाची सुरक्षा सीआयएसएफकडे आहे, अशी माहिती नवी मुंबई पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी दिली. राज्यात गेल्या चार दिवसांत शिरपूर वाघाडी कंपनीला पहिल्यांदा आग लागली. त्यात १५ जण आगीत होरपळून मयत झाले. त्यानंतर मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणला जाणारी बस जळून खाक झाली. मात्र, सुदैवाने त्यातील ५२ प्रवासी वाचले. त्यानंतर मुंबईत आग लागल्याची घटना घडली. आज उरण ओएनजीसी प्रकल्पामध्ये आग लागली. चार आगीच्या घटना लागोपाठ घडल्या आहेत.
