लांजा एसटी आगाराचा भोंगळ कारभार सुरू

0

लांजा : अर्ध्याहून अधिक गळक्या गाड्या, बसस्थानकातील स्वच्छतागृहांची दूरवस्था, दोन महिन्यांपासून बंद असलेला हायमास्ट लॅम्प, मुंबईसाठी गाड्या सोडण्यात असलेली अनास्था आदी विविध कारणांमुळे लांजा एसटी आगाराचा भोंगळ कारभार सुरू असून, ऐन गणेशोत्सवात त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. मात्र आगार व्यवस्थापकांकडून त्याबाबत कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याने प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष संजय आयरे यांनी या गैरकारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, वरिष्ठ पातळीवर दाद मागणार असल्याचे सांगितले. जि.प.चे माजी बांधकाम सभापती दत्ता कदम यांनी याबाबत विभाग नियंत्रकांना पत्र देऊन लोकांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. याबाबत संजय आयरे आणि दत्ता कदम यांनी सांगितले कि, लांजा आगाराचा प्रशासकीय कारभार हा अतिशय भोंगळ आणि बेजबाबदारपणे सुरू आहे. याविषयी आपण स्थानिक स्तरावर आगार व्यवस्थापकांशी बोलनही आणि त्यांच्या या गोष्टी निदर्शनास आणूनदेखील त्यांच्याकडून कार्यवाही झालेली नाही. लांजा आगारातील एकूण ५६ एसटी गाड्यांपैकी निम्म्या बस या गळक्या असून, त्यांचा त्रास हा प्रवाशांना सहन करावा लागतो. लांजा बसस्थानक हे मुंबईगोवा महामार्गावर वसलेले असल्याने याठिकाणी प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. त्यामुळे रात्रीच्यावेळी बसस्थानाकात पुरेशा विजेची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, बसस्थानकातील हायमास्ट लॅम्प गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. परिणामी काळोखामध्येच प्रवाशांना गाड्या पकडण्याची वेळ येत आहे. गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून, मुंबईकर चाकरमानी मोठ्या प्रमाणात गावी दाखल होत आहेत. बसस्थानकातील काळोखामुळे आणि बसस्थानकात पडलेल्या खड्डयांमुळे त्यांची गैरसोय होत आहे. बसस्थानकातील स्वच्छतागृहांची दूरवस्था झाली असून, बऱ्याचदा याठिकाणी अस्वच्छता आणि दुर्गंधीचे वातावरण असते. लांजा बसस्थानकातून मुंबई फेऱ्या सोडण्याबाबतही अनास्था आहे. यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगाराचा कारभार सुधारण्याच्यादृष्टीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here