रत्नागिरी : सरकारी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून त्यांना शिवीगाळ करत पाली दुरक्षेत्र इमारतीमधील प्लास्टिकची टाकी व झाडांच्या कुंड्या फोडल्या प्रकरणी दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी दुपारी १.३५ वा. सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील पाली येथील शिवाजी चौक येथे घडली होती. नरेंद्र सुरेश चव्हाण (२८) आणि श्रीकृष्ण सुरेश चव्हाण (३२, दोन्ही रा.साठेबांबर, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात पोलिस कर्मचारी सुमित राजाराम चिले (२५) यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार,रविवारी ते मुंबईगोवा महामार्गावरील वाहतुक सुरळित पार पडावी यासाठी पाली बाजार पेठेत कर्तव्य बजावत होते.तेव्हा त्यांना पाली एसटी स्टँड समोरील पान टपरी वाल्यास मारहाण झाली असून, त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवण्यात आल्याचे समजले. ते घटनास्थळी गेले असता त्यांना पाहून नरेंद्र आणि श्रीकृष्ण पळू लागले. तेव्हा चिले यांनी नागरिकांच्या सहाय्याने त्यांना पकडले. ते त्यांना पाली दुरक्षेत्र येथे घेऊन जात असताना त्यांची नावे विचारली असता त्यांनी सुमित चिले यांची कॉलर धरुन त्यांना शिवीगाळ केली. तसेच पाली दरक्षेत्र इमारतीमध्ये आल्यावर त्या दोघांनी तेथील पाण्याची टाकी आणि झाडांच्या कुंड्या फोडून नुकसान केले. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
