खेड : विकासकामांच्या बळावर दापोली विधानसभा मतदार संघावर भगवा डौलाने फडकेलच, असा विश्वास राज्याचे पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते ना.रामदास कदम यांनी येथेव्यक्त केला. खेड तालुक्यात त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्याला दि.३१ ऑगस्टपासून नातूनगर-तुळशी रस्त्याच्या उद्घाटनाने सुरुवात झाली. यावेळी त्यांच्या सोबत युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम यांच्यासह तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. या दौऱ्यात तालुक्यातील १२ रस्त्यांच्या वर मोठ्या पुलांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.शनिवारी ३१ रोजी सकाळी ११.३० वाजता तुळशी येथे नातूनगर-विन्हेरे-भोगाव रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन ना.कदम यांच्याहस्ते झाले. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले. विकासाच्या राजकारणावरच गेल्या कित्येक वर्षांपासून कोकण भगवेमय झाले आहे. कोकणी जनता यापुढे देखील शिवसेनेसोबतच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चिंचवली बौद्धवाडी येथे रस्ता दुरुस्ती भूमिपूजन, सुकीवली येथे भूमिपूजन, तळे येथे कुडोशी-मांडवे ते जिल्हा हद्द या रस्त्याचे भूमिपूजन, जैतापूर ते घेरा सुमारगड या रस्त्याचे वाडी जैतापूर येथे भूमिपूजन, आंबवली येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, मोहाने येथे मोहानेदेवघर- हुंबरी ते नांदीवली रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. रविवारीही तालुक्यातील विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
