संगमेश्वर तालुक्यातील पशूधन धोक्यात

0

देवरूख : संगमेश्वर तालुक्याच्या लघुपशू सर्वचिकित्सालय देवरूख या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या पदांबरोबरच १५ मंजूर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांपैकी तब्बल १२ पदे रिक्त आहेत. यामुळे तालुक्यातील पशूधन धोक्यात आले आहे. शेतीबरोबरच पूरक व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादनाकडे पाहिले जाते. मात्र गेले काही माहिने दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने दुग्धव्यवसाय धोक्यामध्ये आला आहे. यामुळे शेतकरी वर्गामधून कमालीचा संताप निर्माण झाला आहे. संगमेश्वर तालुक्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट योजना तत्कालीन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या पुढाकारातून राबवण्यात आली होती. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी दुधाळ जनावरे घेऊन दुग्धोत्पादन व्यवसायाला चालना दिली होती. मात्र त्यानंतर या क्लस्टर डेव्हलपमेंटचा विचार तेवढ्याच गांभीर्याने होत नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यामध्ये सध्या ११ दुग्ध सहकारी संस्था कार्यरत आहेत. यांच्या माध्यमातून प्रतिदिनी सुमारे साडेतीन ते चार हजार लिटर दूधसंकलन होत आहे. दुधाळ गाईंची देखभाल व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पशुधन अधिकाऱ्यांची गरज असते. मात्र सध्या या पशुधनाची काळजी व उपचार करण्याकरिता वैद्यकीय अधिकारी नसल्याने दुग्धोत्पादन व्यवसायास उतरती कळा लागण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. यामुळे ही पदे भरण्यात यावीत, अशी मागणी होत आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तत्काळ भरली जावीत, असा विषय आमसभेत देखील घेण्यात आला होता. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. देवरूख येथील तालुका लघुपशु सर्वचिकित्सालय कार्यालय व दवाखाना धरून संगमेश्वर तालुक्याम ध्ये एकूण १५ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. देवरूख दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात २० गावे, देवळे ८ गावे, साखरपा १३ गावे, वांझोळे ८ गावे, आंगवली८ गावे, निवेबुद्रक १० गावे, वांद्री८ गावे, बुरंबी ६ गावे, सोनवडे १० गावे, वाशी ५ गावे, फणसवणे ११ गावे, नायरी ९ गावे, आरवली ४ गावे, कुंभारखणी ७ गावे, बुरंबाड ५ गावे असे एकूण १५ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. तालुक्याम ध्ये १९६ गावांकरिता १५ दवाखाने कार्यरत असून त्याकरिता १५ पशुधन पर्यवेक्षकांची पदे व परिचरची १५ पदे मंजूर आहेत. मात्र यापैकी पशुधन पर्यवेक्षकाची तब्बल १२ पदे रिक्त आहेत तर परिचरची ११ पदे रिक्त आहेत. यामुळे १२ दवाखान्यांचा अतिरिक्त कार्यभार तीन कार्यरत पर्यवेक्षकांवर येत आहे. तालुका लधुपशु सर्वचिकित्सालय देवरूख येथील कार्यालयात तालुक्याचे सहायक आयुक्त पशुसंवर्धन अधिकारी, पशुधन विकास अधिकारी व पर्यवेक्षक अशी तीन पदे रिक्त आहेत. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याचा विचार येत्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी होणे गरजेचे बनले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here