देवगड : गणेशोत्सवासाठी गावी दाखल झालेल्या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासासाठी देवगड आगार सज्ज झाले आहे. 7 ते 14 सप्टेंबरपर्यंत मुंबई, पुणे मार्गावर परतीच्या प्रवासासाठी 32 जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक हरेश चव्हाण यांनी दिली. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने मुंबई, पुणे व अन्य शहरी भागातून गणेशभक्त गावी दाखल झाले आहेत. यावर्षी रेल्वे व खाजगी प्रवाशांबरोबरच चाकरमानी भक्तजनांनी एस्टी प्रवासालाही जास्त पसंती दिली.गतवर्षी देवगडमध्ये एस्टीच्या 18 गाड्यांमधून गणेशभक्त दाखल झाले होते.यावर्षी 22 गाड्यांनी गणेशभक्त गावी आले असून गतवर्षीपेक्षा चाकरमानी मंडळींनी एस्टीला जादा पसंदी दिली आहे.
गणेशोत्सवासाठी दाखल झालेल्या असंख्य भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठीही देवगड आगाराने नियोजन केले असून 7 सप्टेंबर रोजी होणार्या गौरी विसर्जनानंतर चाकरमाण्यांच्या परतीच्या प्रवासासाठी गाड्यांचे नियोजन केले आहे. 7 सप्टेंबर रोजी जादा बोरिवली 2 व कुर्ला 1 अशा एकूण जादा 3 गाड्या, 8 रोजी जादा 15 गाड्या यामध्ये बोरिवली 6, कुर्ला 1, नाटे बोरीवली 2, पुणे 3 व मुंबई 3 असे गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. 9 रोजी जादा बोरिवली 5, कुर्ला 1, नाटे बोरिवली 1 व मुंबई 1 अशा 8 गाड्या, 10 रोजी तळेरेमार्गे बोरीवली 2, नाटे मार्गे बोरिवली 1, कुर्ला 1 अशा चार गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र 11 व 12 रोजी एकाही गाडीचे नियोजन करण्यात आले नाही.13 व 14 रोजी प्रत्येकी 1 जादा बोरीवली गाडीचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती आगार व्यवस्थापक हरेश चव्हाण यांनी दिली. याशिवाय देवगड तालुक्यात दाखल झालेल्या गणेशभक्तांमुळे आगारव्यवस्थापनाने सकाळी 8.30 वा. जादा सावंतवाडी व नाटेमार्गे जादा रत्नागिरी, दुपारी 12.30 वा .देवगड-सांगली ही गाडी पुन्हा सुरू केली आहे. परतीच्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेवून आणखी जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येईल.ग्रुप बुकींगसाठी प्रवाशांची मागणी आल्यास गाड्या त्वरित उपलब्ध करून देण्यात येतील.प्रवाशांना मुंबई, पुणे मार्गावर सोडण्यात आलेल्या गाड्यांचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री.चव्हाण यांनी केले आहे.
