रत्नागिरी : अवघे कोकण गणरायाच्या आगमनाने भक्तिरसात चिंब न्हाले असताना वरुणराजाकडून बरसात सुरू आहे. गेले दोन दिवस मुसळधार पावसाने कोकणाला झोडपून काढले असताना पुढील तीन दिवस कोकणातील बहुतांश तालुक्यात जोरदार तर काही तालुक्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कुलाबा वेधशाळाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने किनारी भागात आणि दुर्गम भागात सावधगिरीचा आणि सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंगळवारीही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. उत्सवी वातावरणात नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढवू नये, यासाठी प्रशासनाने महामार्गावर आणि आपत्तीप्रवण क्षेत्रात प्रशासनाची आपत्ती नियंत्रण व्यवस्था सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोमवारी जिल्हाभरात गणरायाचे आगमन पावसाच्या साथीनेच झाले. गेले दोन दिवस पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. एकीकडे गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू असताना जोरदार पावसाने त्यांच्या तयारीत आणखीन अतिरिक्त कामांची भर घातली. मंगळवारीही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. अनेक भागांत जोरदार सरींची हजेरी लावत 73. 78 मि.मी.च्या सरासरीने पावसाने दिवसभरात तब्बल 664 मि.मी. मजल गाठली होती. यामध्ये सर्वाधिक पाऊस रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यात नोंदविला गेला. जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांत पावसाने पन्नाशीपेक्षा जास्त मजल मारली होती. यामध्ये मंडणगड तालुक्यात 66, दापोली 98, खेड 42, गुहागर 30, चिपळूण 52, संगमेश्वर 51, रत्नागिर ी137, लांजा 115 आणि राजापूर तालुक्यात 73 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 3830 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत पावसाने 3343 मि.मी.ची नोंद केली होती. गतवर्षाच्या तुलनेत या वर्षी पावसाने 500 मि.मी. ची आघाडी घेतली आहे. दरम्यान, आगामी तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. त्यानसार प्रशासनाने किनारी भागात मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्याच्या अपघातप्रवण क्षेत्रात खबरदारी घेताना महार्गावरील सुरक्षा व्यवस्थे प्रशासनाने वाढ केली असून सवेदनशील धरण असलेल्या भागातही आपत्ती नियंत्रण व्यवस्थेला प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
