आचरा : ऐन चतुर्थीच्या दिवशी सोमवारी रात्री आचरा गावातील किनारपट्टी भागातील वाड्यामधील खंडित झालेला वीजपुरवठा मंगळवारी दुपारपर्यंत सुरू न झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आचरा महावितरण कार्यालयावर मंगळवारी दुपारी धडक दिली. ग्रामस्थांची समस्या ऐकण्यासाठी कोणीच जबाबदार अधिकारी कार्यालयात नसल्याने जोपर्यंत अधिकारी येत नाही तोपर्यंत कार्यालयातून हलणार नसल्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी देत कार्यालयातच ठाण मांडले. उशिराने कार्यालयात आलेल्या अभियंता सिंग यांना त्यांच्या केबिनमध्ये जाऊ न देता कार्यालयातच रोखत ग्रामस्थांनी धारेवर धरले. पुन्हा चतुर्थी कालावधीत वीज समस्या उद्भवल्यास पुढील तीन महिने लाईट बिल भरणार नसल्याचा इशारा दिला. सोमवारी चतुर्थी दिवशी रात्री लाईट गेल्यामुळे आचरा जामडूल पिरावाडी, गाऊडवाडी, हिर्लेवाडी भागातील ग्रामस्थांना गणेशोत्सवासाठी ठेवलेले कार्यक्रम रद्द करावे लागले. याबाबत महावितरणच्या कर्मचार्यांशी संपर्क साधल्यास उर्मट उत्तरे दिली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.सोमवारी रात्री गेलेली वीज मंगळवारी सकाळपर्यंत आली नसल्याने मंगळवारी दुपारी जि.प.बांधकाम सभापती जेरॉन फर्नांडिस यांच्यासह उपसरपंच पांडूरंग वायंगणकर,माजी सरपंच राजन गांवकर, जगदीश पांगे, राजन पांगे, ग्रा.पं. सदस्य मुझफ्फर मुजावर, रवींद्र गुरव, लक्ष्मण आचरेकर, विजय कदम, मनोहर वाडेकर, बाळू वस्त यांच्यासह आचरा व्यापारी संघटनेचे अभिजित सावंत, जयप्रकाश परूळेकर, निखिल ढेकणे आदींसह जामडूल, पिरावाडी, हिर्लेवाडी, गाऊडवाडीतील ग्रामस्थांनी आचरा महावितरण कार्यालयावर धडक दिली. वीज बिल भरणा नसल्यास तत्काळ कनेक्शन तोडण्याची तत्परता दाखविणार्या विद्युत मंडळाकडून वीज समस्या उद्भवल्यावर तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात तेवढी तत्परता का दाखविली जात नाही? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित करत चतुर्थी कालावधीत वीजेची समस्या उद्भवल्यास ग्रामस्थांचा उद्रेक होण्याचा इशारा दिला. जेरॉन फर्नांडिस यांनी चतुर्थी कालावधीत आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये म्हणून 24 तास कर्मचारी तैनात ठेवण्यास सांगितले. जगदीश पांगे, अभिजित सावंत आदींनी उर्मट उत्तरे देणार्या कर्मचार्यांवर तातडीने कारवाई करण्यास सांगितले. याबाबत अभियंता सिंग यांनी पुन्हा विद्युत समस्या निर्माण होणार नाही यासाठी दक्षता घेतली जाईल,असे स्पष्ट करत कर्मचार्यांना समज दिली जाईल असे सांगितले.
