मच्छिमारांसमोरचे व्यावसायिक दुष्टचक्र कायम

0

रत्नागिरी : जोरदार पावसासोबत वाहणार्‍या वादळी वार्‍यांमुळे आणि समुद्रातील पाण्याला असलेल्या करंटमुळे पर्ससीनसह पारंपरिक मासेमारीही कोलमडली आहे. गेल्या तीन दिवसात समुद्रात मासेमारीसाठी कोणतीच नौका गेली नसल्याचे मच्छीमारांनी सांगितले. त्यामुळे मच्छिमारांसमोरचे व्यावसायिक दुष्टचक्र अद्याप संपलेले नाही. पावसाळी मासेमारी बंदीनंतर 1 ऑगस्टपासून पारंपरिक मासेमारी नौका समुद्रात  मासेमारीसाठी जाऊ लागल्या. परंतु, त्यावेळीही पाऊस, वार्‍यासह समुद्रातील पाण्याच्या करंटमुळे अनुभवी तांडेल ज्या नौकांवर आहेत त्याच नौका समुद्रात जात होत्या. 1 सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारी सुरू झाली. परंतु, एकही पर्ससीन नेट नौका त्या दिवसापासून समुद्रात मासेमारीसाठी गेलेली नाही. समुद्रातील वातावरण शांत असल्याचे समजून मिरकरवाडा बंदरातील तीन-चार पर्ससीन नेट नौका गेल्या शनिवारी समुद्रात मासेमारीसाठी गेल्या होत्या. पण त्या नौकांना लगेचच बंदराचा मार्ग धरावा लागला. मासळी पकडण्यासाठी समुद्रात जाळी टाकल्यानंतर ती पाण्याच्या करंटमुळे गुंडाळली जाऊ लागली. अशा परिस्थितीत जाळ्यात मासळी मिळतच नाही उलट महागड्या जाळ्यांचे नुकसान होते. त्यामुळेच या नौका बंदरात परतल्या. या अनुभवावरून इतर पर्ससीन नेट नौकाही त्यानंतर मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या नाहीत. जिल्ह्याला 167 कि.मी.चा समुद्रकिनारा लाभला असून, येथे सुमारे 4 हजार मच्छीमार नौका मासेमारी करतात. पारंपरिक मासेमारी 1 ऑगस्टपासून सुरू झाली. मात्र त्यानंतरही पाऊस, वारा आणि पाण्याला करंट असल्याने घाबरत मासेमारी सुरू होती. आधीच पारंपरिक मच्छिमार नौकांना मासळी मिळत नाही. त्यात अशी नैसर्गिक धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here