रिओ दि जानेरो : भारताचे युवास्टार नेमबाज मनू भाकेर आणि सौरभ चौधरी या जोडीने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात मिश्र गटात सुवर्णपदक जिंकून विश्वचषक नेमबाजी स्पर्धेची सोनेरी सांगता केली. याच गटात भारताच्या यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्मा या जोडीने रौप्यपदक जिंकले. 26 ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या या स्पर्धेचा मंगळवारी शेवट झाला. तत्पूर्वी, सकाळी 10 मीटर एअर रायफल प्रकारात अव्वल मानांकित अपूर्वी चंदेला आणि दीपककुमार या जोडीने भारतासाठी चौथे सुवर्णपदक जिंकले. याच इव्हेंटमध्ये अंजुम मुदगल आणि दिव्यांशसिंह पवार यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ब्राझीलची राजधानी रिओ दि जानेरो येथे संपलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताने 5 सुवर्णपदके, 2 रौप्यपदके आणि 2 कांस्यपदकांसह पदक तालिकेत अव्वलस्थान मिळवले. भारताने यंदा झालेल्या वेगवेगळ्या प्रकारातील चार विश्वचषक स्पर्धेत 22 पदके जिंकली आहेत. यामध्ये 16 सुवर्णपदकांचा समावेश आहे.
