रायगड : रायगड जिल्ह्यात मागील 24 तासात 177.69 मिमी पाऊस झाला आहे. सध्या सुरू असलेला पाऊस व दुपारी तीनची पूर्ण भरती यामुळे सखल भागामध्ये पाणी भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सखल भागातील नागरिकांना सतर्क राहून योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. तसेच आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे अशा सूचना प्रशासनाने नागरिकांना दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून सर्व अधिकारी, तलाठी, कोतवाल यांना गावांमध्ये जाऊन आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ मदतकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने जिल्ह्यातील खासगी, शासकीय विभागाच्या बोटी आणि पथके तयार ठेवली आहेत अशी माहिती दिली. तसेच NDRF ची टीम बोलाविण्यात आली आहे.हवामान खात्याने पुढील ४८ तास जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. सर्व विभाग व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
