मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर संतप्त प्रवासी रेल्वे रुळावर उतरले. यामुळे एकच गोंधळ उडाला. कोकणात जाणारी एक्सप्रेस उशिराने धावत असल्याने संतप्त झालेले प्रवासी रुळावर उतरल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मंगळवारपासून कोसळत असणाऱ्या पावसाचा फटका रेल्वेलाही बसला आहे. यामुळे अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही उशिराने धावत आहेत. कोकणात जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द आल्या आहेत. बुधवारी अतिवृष्टीमुळे कोकणात जाणाऱ्या गाड्या पनवेल, रोहा येथे रद्द करण्यात आल्या होत्या. कोकणात जाणारी ‘तुतारी एक्सप्रेस’ काल रद्द करण्यात आली होती आणि आज ती उशिराने धावत आहे. तसेच दादर-रत्नागिरी पॅसेंजरही उशिराने धावत आहे.
यामुळे गेल्या 24 तासांपासून गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी गर्दी केलेल्या लोकांचा उद्रेक झाला. रेल्वे स्थानकावर ताटकळत उभ्या असलेले प्रवासी संतप्त झाले आणि 20 ते 25 प्रवाशांनी थेट रुळावर ठाण मांडले. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांनी धावपळ उडाली. दरम्यान, प्रवासी रेल्वे रुळावर उतरल्याचे निदर्शनास आल्यावर जीआरपी, आरपीएफ आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांची समजूत काढली. यानंतर प्रवाशांचा राग शमला आणि त्यांनी रुळ मोकळा करून दिला. यानंतर रेल्वे प्रशासनाने वेळ न दडवता कोकणात जाणारी गाडीही प्लॅटफॉर्मवर आणली असून प्रवाशांचा राग शांत झाला.
