पोषक स्थिती निर्माण झाल्याने सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावतो आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने राज्यात बहुतांश ठिकाणी गणेशोत्सवाच्या काळात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकणसह मुंबई, ठाण्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधारांचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये धुवाधार कोसळलेल्या पावसाने राज्यात बहुतांश ठिकाणी पूरस्थिती निर्माण केली होती. त्यानंतर दीर्घकाळ दडी मारलेला पाऊस पोषक स्थितीमुळे पुन्हा सक्रिय झाला आहे. दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या मराठवाडय़ातही पावसाने हजेरी लावल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
