भारत चंद्रावर इतिहास घडवण्याच्या अत्यंत समीप पोहोचला आहे. सर्वसामान्य भारतीयांसह चांद्रयान-२ मोहिमेत सहभागी असलेल्या वैज्ञानिकांमध्ये उत्सुक्ता आणि तितकचं टेन्शनही आहे. कारण विक्रम लँडरचा चंद्रापर्यंतचा शेवटचा ३५ किमीचा प्रवास मोहिमेतील अत्यंत खडतर टप्पा असेल. १५ मिनिटांचा हा काळ भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या वैज्ञानिकांसाठी आव्हानात्मक असेल.
चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करताना विक्रम लँडरचे कुठलेही नुकसान होणार नाही ही काळजी शास्त्रज्ञांना घ्यायची आहे. रात्री १ वाजून ५५ मिनिटांनी लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. विक्रम लँडरच्या आतमध्ये प्रग्यान रोव्हर आहे.
हा रोव्हर चंद्रावर शोधकार्याचे काम करणार आहे. इस्रोचे प्रमुख डी.के.सिवन यांनी चंद्रावरील या लँडिंगची तुलना नवजात अर्भकाबरोबर केली आहे.
अचानक कोणी तरी येऊन नुकतेच जन्मलेले बाळ तुमच्या हातात देते तशी ही घटना असेल. व्यवस्थित आधाराशिवाय तुम्ही ते बाळ हातात पकडू शकता का? ते मुल कुठल्याही दिशेला वळेल पण तुम्हाला ते व्यवस्थित पकडायचे आहे. विक्रम लँडरचे लँडिंग सुद्धा असाच अनुभव असेल. नवजात बाळासारखे तुम्हाला लँडरला हाताळायचे आहे असे सिवन यांनी सांगितले.
दोन सप्टेंबरला विक्रम लँडर ऑर्बिटरपासून वेगळा झाला. तेव्हापासून आतापर्यंत दोनवेळा यशस्वीरित्या कक्षाबदल करुन विक्रम चंद्राच्या जवळ पोहोचला आहे. चंद्रावर लँडिंग करण्याची प्रक्रिया खूप कठीण आहे आणि आमच्यासाठी नवीन आहे. यापूर्वी ज्यांना अशा लँडिंगचा अनुभव आहे त्यांच्यासाठी सुद्धा प्रत्येकवेळी ती कठीण प्रक्रिया होती. आमची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे शेवटचा १५ मिनिटांचा तो काळ आमच्यासाठी तणावाचा असेल असे सिवन यांनी सांगितले.
