अमेरिकेतील सेवा क्षेत्राची वाढ चांगली झाल्याची आकडेवारी समोर आली असून, त्याचा परिणाम सोने-चांदीच्या भावात घसरण होण्यात झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या दोन्ही धातूंच्या भावात सुमारे 3 टक्के घट झाल्याचे आज रात्री दिसून आले. परिणामी, भारतातील वायदे बाजारात (एमसीएक्स) सोने दहा ग्रॅममागे एक हजार रुपयांनी (38,600), तर चांदी एका किलोमागे दोन हजार रुपयांनी (49,300) उतरली होती.
इन्स्टिट्यूट ऑफ सप्लाय मॅनेजमेंटने (आयएसएम) नॉन-मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स म्हणजेच सेवा क्षेत्राचा निर्देशांक आज जाहीर केला. जुलैतील 53.7 टक्क्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये तो 56.4 टक्क्यांवर नोंदला गेल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या निर्देशांकात 2.7 टक्क्यांनी झालेली वाढ ही बाजारालाही चकीत करून गेली. अशी 50 टक्क्यांच्या वर आकडेवारी दिसत राहिल्यास ते आर्थिक प्रगतीचे लक्षण मानले जाते.
