गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीसाठी कोकण रेल्वेने शनिवार आणि रविवारी दोन जादा गाड्या सोडल्या आहेत. त्या मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी आणि परत या मार्गावर धावतील.
लोकमान्य टिळक टर्मिनसहून आज रात्री सुटणारी जादा गाडी उद्या (दि. ७ सप्टेंबर) पहाटे रत्नागिरीत पोहोचणार असून ती (गाडी क्र. 01228) सकाळी ८ वाजता रत्नागिरीहून मुंबईसाठी रवाना होईल. सायंकाळी साडेचार वाजता ती लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचणार आहे. ही गाडी संगमेश्वर, आरवली, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल आणि ठाणे येथे थांबेल. गाडीला २२ डबे असतील, त्यापैकी १० डबे अनारक्षित असतील.
याच मार्गावर 01229 / 01230 क्रमांकाची गाडी उद्या (दि. ७ सप्टेंबर) रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी रवाना होणार असून ती रविवारी सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी रत्नागिरीला पोहोचेल. दुपारी १ वाजता ती परतीच्या प्रवासासाठी मुंबईकडे रवाना होणार आहे. रात्री १० वाजून १० मिनिटांनी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाडीलाही २२ डबे असतील. त्यापैकी थ्री टायर एसीचे ५, दुसऱ्या वर्गाचे ५ शयनयान डबे, तर अनारक्षित १० डबे असतील.
