भाजपचा 110 जागांचा प्रस्ताव शिवसेनेला अमान्य, 135-135-18 च्या सूत्रावर ठाम

0

मुंबई : सालाबादप्रमाणे जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर युतीमध्ये तणातणी होण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा निवडणुकांसाठी (Vidhansabha Election 2019) भाजपने (BJP) दिलेला 110 जागांचा प्रस्ताव शिवसेनेला (Shivsena) मान्य नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 135-135-18 या सूत्रावर शिवसेना ठाम असल्याचं म्हटलं जातं.

फिफ्टी-फिफ्टी जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 135-135 जागा लढवाव्यात, अशी शिवसेनेची इच्छा आहे. महायुतीत मित्रपक्षांच्या वाट्याला 18 जागा येतील, असं सेनेने सांगितलं आहे.

मित्रपक्षांनी 18 जागा आपापल्या चिन्हावर लढवाव्यात, भाजपच्या कमळ चिन्हावर लढवू नयेत, अशी शिवसेनेची अट आहे.

मित्रपक्ष जर स्वतःच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नसतील, तर त्यांनी नऊ जागा शिवसेनेच्या धनुष्यबाण, आणि नऊ जागा भाजपच्या कमळ चिन्हावर लढवाव्यात, असं शिवसेनेचं म्हणणं आहे.

भाजपच्या आमदारांची संख्या वाढवण्यासाठी मुख्यमंत्री मित्रपक्षांना कमळ चिन्हावर लढवण्यास सांगण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळेच शिवसेनेने सावध भूमिका घेतली आहे.

नुकत्याच केलेल्या अंतर्गत सर्व्हेतून भाजपच्या आशा आणखी वाढल्या आहेत. कारण, भाजप किमान 160 जागांवर जिंकेल असा अहवाल समोर आलाय. त्यामुळे 160 पेक्षा अधिक जागा लढवण्यावर भाजपचा जोर आहे.

शिवसेनेला आधी 144 /144 चा फॉर्म्युला हवा होता. तर मित्रपक्षांना भाजपच्याच कोट्यातून जागा देण्याची मागणी शिवसेनेने केल्याचं म्हटलं जात होतं. मात्र शिवसेनेने आस्ते कदम घेत 135 जागांवर तडजोडीची तयारी दर्शवल्याचं दिसत आहे.

युतीतील मित्रपक्षांपैकी रिपाइं (RPI) हा सर्वात मोठा पक्ष असल्याने आम्हाला 10 जागा द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं होतं. 22 ते 23 जागांची यादी मुख्यमंत्र्यांकडे दिल्याचं रामदास आठवले म्हणाले होते.

माझा पक्ष रजिस्टर असातना भाजपच्या चिन्हावर का लढायचं, याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. अद्याप विचारविनिमय सुरु आहे, असंही आठवले म्हणाले होते.

पक्षाची ओळख वेगळी ठेवायची असेल तर आपल्या चिन्हावर लढलं पाहिजे, मी महाराष्ट्र निवडणूक आयोगाशी बोलणार आहे. स्वतंत्र चिन्ह द्यावं, यासाठी प्रयत्न आहे, असं आठवलेंनी नमूद केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here