रत्नागिरी दि.06:- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातंर्गत रत्नागिरी औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन केंद्राचे उद्घाटन आज म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करुन संपन्न झाले. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संतोष वारीक, पंचायत समिती सभापती विभांजली पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, मिरजोळे गावाचे सरपंच एकनाथ मयेकर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी मिलींद ओगले, औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्री.करवडे आदी उपस्थित होते.
यावेळी सामंत म्हणाले, सन 2014 मध्ये रत्नागिरीच्या एमआयडीसीतील उद्योजकांनी मागणी केल्याप्रमाणे रत्नागिरी एमआयडीमध्ये अग्निशमन केंद्र उभारण्यात आले असून ते आता पूर्णपणे कार्यान्वित होत आहे. आपतकालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन यंत्रणा फार महत्वाची असते. मंत्रालयामध्ये लागलेल्या आगीत अग्निशमन दलाच्या जवानांनी महत्वाची भूमिका बजाविली. त्यावेळी या दलाचे जवान मृत्यूला सामोरे गेले आणि त्यांनी मंत्रालयातील लोकांचे प्राण वाचविले असे सांगताना त्या दिवसाची मंत्रालयातील आपली आठवणही त्यांनी सांगितली. अग्निशमन दलामार्फत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा फायदा येथील एमआयडीसीच्या स्थानिक उद्योजकांनी करुन घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
आपल्या प्रास्ताविकात औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्री. करवडे यांनी सांगितले, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे हे 32 वे अग्निशमन केंद्र कार्यान्वित होत असून या इमारतीमध्ये अग्निशमन दलाच्या सर्वतोपरी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. हे केंद्र ब दर्जाचे असून यामध्ये एकूण 36 निवासस्थाने आहेत. जिवीतहानी व वित्तहानी कमी करणे हे अग्निशमन दलाचे मुख्य कार्य असून हे केंद्र आपली जबाबदारी चोखपणे पार पाडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता चंद्रकांत भगत, सहायक अभियंता बी.एन.पाटील एमआयडीसीतील उद्योजक, कामगार, अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
