पत्रकार रवीश कुमार रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित

0

मनिला : देशातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आवाज मिळवून देणाऱ्या निर्भीड पत्रकारितेबद्दल 2019चा “61वा रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ प्रसिद्ध भारतीय पत्रकार रवीश कुमार यांना प्रदान करण्यात आला. 3 ऑगस्टला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे हा समारंभ पार पडला. पुरस्कार प्रदान केल्यानंतर रवीश कुमार म्हणाले, ‘प्रत्येक लढाई ही जिंकण्यासाठी नाही लढली जात, तर कोणीतरी लढतोय हे दुनियेला कळावं यासाठीही लढली जाते. मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाल्यापासून माझं जगच बदललं आहे. या देशाने दिलेला सन्मान आणि इथला पाहुणचार बघून मी भारावून गेलो आहे.’

रवीश कुमार यांच्यासह म्यानमारचे पत्रकार को स्वे विन, थायलंडमधील मानवी हक्क कार्यकर्त्या अंगखाना नीलापजित, फिलिपिन्समधील संगीतकार रेमुंडो पुजांते कायाबयाब आणि दक्षिण कोरियामध्ये तरुणांमधील हिंसा आणि मानसिक आरोग्यासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते किम जोंग-की यांना यंदाच्या “रॅमन मॅगसेसे पुरस्कारा’ने गौरविण्यात आले

फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे आज पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यंदा हा पुरस्कार पाच जणांना देण्यात आला, त्यात रवीश कुमार हे एकमेव भारतीय आहेत.

एनडीटीव्ही इंडिया या वृत्तवाहिनीचे व्यवस्थापकीय संपादक असलेले 44 वर्षीय रवीश कुमार यांचा भारतातील सर्वांधिक प्रभावशाली पत्रकारांमध्ये समावेश होतो, असे पुरस्कार समितीने म्हटले आहे. आपल्या “प्राइम टाइम’ या कार्यक्रमाद्वारे सर्वसामान्यांच्या दुर्लक्षित प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचे काम ते करतात. ज्यांचा आवाज दाबला जातो, अशा घटकांचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोचविण्याचे काम रवीश कुमार यांची पत्रकारिता करते. लोकांचा आवाज बनणे हीच पत्रकारिता आहे, अशा शब्दांत पुरस्कार निवड समितीने रवीश कुमार यांचा गौरव केला आहे.

सत्याचे रक्षण करण्यासाठीचे धैर्य, उच्च दर्जाची नैतिक पत्रकारिता ही रवीश कुमार यांची वैशिष्ट्ये आहेत. आवाज नसलेल्यांचे प्रश्न अतिशय संयमीतपणे मांडत, सत्तेला जाब विचारणारी त्यांची पत्रकारिता लोकशाहीला बळकट करणारी आहे, त्यामुळे म्हणून रवीश कुमार यांची या पुरस्कारासाठी निवड करताना आम्हाला आनंद होतो, असेही पुरस्कार प्रदान करणाऱ्या मंडळाने म्हटले आहे.

फिलिपिन्सचे तिसरे अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 1957 पासून दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. निःस्वार्थ सेवा आणि परिवर्तनशील कार्यासाठी व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्काराने गौरविले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here