रत्नागिरी, १० सप्टेंबर, (हिं. स.) : कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवाच्या कालावधीसाठी दादर ते सावंतवाडी मार्गावर धावणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसला चार जादा डबे जोडण्यात आले होते. आजपर्यंत सुरू असलेली ही सुविधा येत्या १५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
कोकणातील सर्वांत मोठ्या गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी होते ती लक्षात घेऊन कोकण रेल्वेने गेल्या २६ ऑगस्टपासून जादा २१० गाड्या सोडल्या, तर काही गाड्यांचे डबे वाढविले. तुतारी एक्स्प्रेसला द्वितीय वर्ग शयन यानाचे नेहमी ७ डबे असतात. त्यामध्ये तीन डब्यांची वाढ उत्सवाच्या काळापुरती करण्यात आली. नेहमी अनारक्षित ८ डबे असतात.
त्यामध्येही एका डब्याची वाढ करण्यात आली. हे वाढीव डबे आजपर्यंतच जोडण्यात आले होते. मात्र परतीच्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तुतारी एक्स्प्रेसचे जादा चार डबे येत्या १५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात येणार आहेत. त्याचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
