तालुक्यातील कापडगावचे सुपुत्र रमेश कांबळे यांनी अथक परिश्रमाने व कौशल्याने साकारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले. यामुळे रत्नागिरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राज्याच्या राजकारणाचाच नव्हे तर प्रशासनाचा केंद्रबिंदू म्हणून मंत्रालय या इमारतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. ज्या महामानवाच्या संविधानावर याच इमारतीमधील कारभार चालविला जातो त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र या इमारतीत असावे, यासाठी राज्याच्या आंतरजातीय विवाह स्वतंत्र कायदा समितीचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्तेप्रवीण भोटकर यांनी शासनाने सातत्याने पाठपुरावा केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर तैलचित्र कसे असावे कोणाला त्याचे काम द्यावे यासंदर्भात भोतकर यांनी बार्टीच्या (डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) अधिकार्यांसोबत चर्चा करून जागेचे मोजमाप आणि तैलचित्राबाबत संबंधित अधिकारी आणि तैलचित्र बनवणार्या कलाकारांना विचारणा केली. मात्र, त्यांनी या तैलचित्राच्या निर्मितीचा अफाट खर्च संगितल्याने मुंबई येथील प्रसिद्ध चित्रकार रमेश कांबळे यांचा उल्लेख झाल्यानंतर त्यांना चर्चेसाठी बोलाविले आणि त्यांना यासंदर्भात विनंती केली असता त्यांनी लगेच होकार दिला.
दि. 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनी या तैलचित्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण व्हावे असे ठरले. वेळ अत्यंत कमी होता 7 ऑगस्टला चित्रकार कांबळे यांना वर्क ऑर्डर देण्यात आली. त्यांनी हे आव्हान स्वीकारले. आणि 14 ऑगस्ट ला बाबासाहेबांचे सुंदर असे तैलचित्र आणि संविधानाची प्रास्ताविका तयार करून मंत्रालयाकडे सुपूर्द केली. मात्र, काही कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.
या तैलचित्राचे दि. 9 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी दामोदर कांबळे, प्रवीण कांबळे, समीर कांबळे आदी उपस्थित होते. चित्रकार रमेश कांबळे हे बॉम्बे आर्ट सोसायटीचे आजीवन सदस्य, आर्ट ऑफ इंडियाचे सदस्य, बौद्धजन हितवर्धक संघ कापडगाव (मुंबई)चे सदस्य आहेत.
