“दीपावली प्रकाशाचा उत्सव ” फटाक्यावर बंदी आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक

0

✍️ अँड. विलास पाटणे

➡ राजस्थान, ओरिसा, बंगाल, आणि हरीयाणा सरकारने फटाक्यावर बंदी आणली आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने केंद्र सरकारच्या पर्यावरण खाते व चार राज्य सरकारला सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने फटाक्यावर बंदी आणण्याच्या दृष्टीने नोटीस दिली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने फटाक्यावर बंदी आणली पाहीजे. खरे तर दीपावली हा प्रकाशाचा उत्सव असतो. आवाजाचा नसतोच. फटाके ही आपली मूळ संस्कृती नाहीच.. आपली संस्कृती मुळात पर्यावरणवादी आहे.
मुळात आवाजी फटाक्यांचे लोण पाश्चात्यांच्या अनुसरणातून फोफावले. ब्रिटिश भारतात आल्यानंतर फटाके संस्कृती व्यापक होत गेली.
फटाका उद्योगावर लाखो लोक अवलंबून असल्याचा आणि फटाकेबंदी झाल्यास ते बेरोजगार होण्याचा धोकाही वर्तविला जातो. ग्रीन फटाक्याची कल्पना ही शोधलेली पळवाट आहे. सर्वोच्च न्यायालयाने घातलेले 125 डेसिबलच्या पुढील आवाजाच्या तसेच सत्रो 10 ते सकाळी 6 वाजेपर्यतच्या बंदीचे काटेकोर पालन होत नाही; काही असले तरी फटाक्यांचा अतिवापर घातक व गंभीर आहे हे विसरता येणार नाही. हवेतील सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण फटाक्यांमुळे वाढते. त्यामुळे श्वसनास त्रास होतो. फटाक्यांच्या निर्मितीमध्ये विविध रंगांचा वापर केला जात असल्याने फटाके हवेत फुटताच रंगात वापरलेले कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि कॉपर हे धातू हवेत मिसळतात. ‘पार्टीकुलेट मॅटर’द्वारे श्वसनात येतात. त्यातून फुफ्फुसांचे आजार बळावतात. वर्षभरात फटाक्यांमुळे होणाऱ्या मृत्यू व अपघाताची वाढणारी संख्या गंभीर आहे. करोना तर श्वसनाशी संबाधित व्हायरस आहे. अशावेळी हवा अधिकाधिक शुद्ध राहील याकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे.

शाळा-शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देताना फटाकेबंदीची शपथ दिली जात आहे. ही चळवळ जशी जशी वाढेल तसे फटाक्यांचे आवाज कमी होईल. फटाक्यांचा ‍आवाज कमी होत असताना पर्यावरण रक्षणाचा आवाज बुलंद झाला तर खरा बदल दिसेल. चहुकडे पसरलेला धूर आरोग्यदायी नसतो.
दीप उजळून अंधकार दूर करायचा की फटाके उडवून धूर उडवायचा हा निर्णय प्रत्येकाने घ्यायचा आहे. अज्ञानातून आणि उत्साहाच्या नादात केलेली फटाक्याची आतषबाजी थांबली तर भविष्यात नक्कीच ‘आवाज’ क्षीण झालेला असेल.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:09 AM 05-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here