रत्नागिरीत गणेशविसर्जनाच्या वेळी अडीच टन निर्माल्य संकलित

0

रत्नागिरी नगरपालिका, रोटरी क्लब आणि शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणेच गणेशविसर्जनाच्या वेळी निर्माल्य गोळा करण्याचा उपक्रम राबविला. त्याला नागरिकांनीही मोठा प्रतिसाद दिला. यावर्षी आतापर्यंत विसर्जनावेळी अडीच टन निर्माल्य गोळा करण्यात आले.

निर्माल्य संकलनासाठी नगरपालिकेने विशेष व्यवस्था केली होती. आलेले निर्माल्य तीन प्रकारात गोळा करण्यात आले. ओले, सुके आणि प्लास्टिकचे निर्माल्या अशी वर्गवारी करण्यात आली. ओल्या निर्माल्यावर भाट्ये संशोधन केंद्रात प्रक्रिया करून जैविक खत तयार केले जाणार असल्याची माहिती प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी यांनी दिली.

पूर्वी निर्माल्य समुद्रात टाकले जात होते. त्यामुळे ते वाहून किनाऱ्यावर परत येत असे. आता निर्माल्य गोळा करण्याच्या उपक्रमाला नागरिकांनीही प्रतिसाद दिल्यामुळे निर्माल्य समुद्रात न टाकता या संस्थांमार्फत गोळा केले जाते. यामुळे समुद्रात प्रदूषण कमी व्हायला मदत झाली आहे.

दरम्यान, जिद्दी माउंटेनिअरिंगची मांडवी किनारा स्वच्छता मोहीम यावर्षीही राबविली. सामाजिक बांधिलकी ठेवत जिद्दी माउंटेनिअरिंगने गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर मांडवी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबवली. समुद्रात विसर्जन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी किनाऱ्यावर आलेले निर्माल्य, प्लास्टिक तसेच अन्य गोष्टी सुजाण नागरिकांच्या मदतीने जिद्दी माऊंटेनिअरिंगने साफ करून समुद्रकिनारा स्वच्छ केला. अशीच मोहीम पुन्हा अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता मांडवी समुद्रकिनारी आयोजित केली आहे.

जिद्दी माऊंटेनिअरिंगचे धीरज पाटकर यांनी सांगितले की, निर्माल्य गोळा करण्यासाठी केंद्र असतानाही खूप निर्माल्य समुद्रात आढळून आले. प्लास्टिक, थर्माकोल आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती यांचा उपयोग अजूनही केला जात आहे. आपले पर्यावरण वाचवण्यासाठी या गोष्टींचा वापर टाळणे गरजेचे आहे. समुद्रात विसर्जन केलेल्या गोष्टी समुद्र कधीच पोटात ठेवत नाही. त्या नेहमी बाहेरच टाकतो. नागरिकांनीच आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हातभार लावावा. पुन्हा होणाऱ्या स्वच्छता मोहिमेत सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. तसेच पुन्हा पुढच्या वर्षी येणाऱ्या गणेशोत्सवाला या सर्व गोष्टींचा वापर टाळावा. शाडूच्या मातीची मूर्ती घरी आणावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here