रत्नागिरी – जिल्हा परिषद अध्यक्षांसह अन्य पदाधिकारी आणि सदस्यांना विश्वासात न घेता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल मनमानी कारभार करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत आणि अध्यक्षा स्वरूपा साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. समुपदेशनानंतर हा निर्णय घेण्यात आला.
शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले, आंतरजिल्हा शिक्षक बदल्या करताना जिल्ह्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीचा विचार करावा अशी भूमिका अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. बदल्या करु नयेत असे पत्रही दिले होते. तो निर्णय डावलून सीईओंनी रातोरात बदल्या केल्या.
सीईओ लोकप्रतिनिधींना जुमानत नाहीत, मनमानी कारभार करतात म्हणून निर्णय घेण्यासाठी जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते. त्यामध्ये अविश्वास ठरावावर शिक्कामोर्तब झाला.
शिक्षक बदल्यांमुळे होणाऱ्या रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होईल. ही बाब पदाधिकाऱ्यांनी सीईओंच्या निदर्शनास आणून दिली. सीइओंच्या पहिल्या पत्रात बदल्या करणार नसल्याचे नमूद होते. मात्र शासन निर्णयानुसार बदल्या कराव्या लागतील असे पत्र मंगळवारी (ता. 10) सायंकाळी उशीरा अध्यक्षांना दिले. त्यानंतर रातोरात 178 शिक्षकांना कार्यमुक्त करत असल्याचे पत्रही पाठविले. ही संघर्षातील शेवटची काडी ठरली.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 94 (3) अन्वये सभागृहाला दिलेल्या अधिकारानुसार सीईओ यांना रत्नागिरीच्या सेवेतून माघारी बोलवावे यासाठी दोन दिवसात नोटीस देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभाही होईल. याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार असल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले.
