रत्नागिरीमधला राजापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जातो. शिवसेनेचे राजन साळवी हे राजापुरचे विद्यमान आमदार आहेत. 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत साळवी या मतदारसंघातून निवडून आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचं चांगलंच वर्चस्व आहे. त्यामुळे, यंदाही राजन साळवी यांचंच पारडं जड असल्याचे पाहायला मिळत आहे.
नाणार आणि जैतापूर हे दोन्ही वादग्रस्त प्रकल्प याच मतदारसंघात असल्याने त्याद्रुष्टीनं हा मतदारसंघ खूप महत्त्वाचा आहे. 2014 साली जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेनं प्रखर विरोध केला होता. त्यानंतर राजन साळवी मोठ्या मताधिक्यानं निवडून आले. आता नाणार प्रकल्पालाही सेनेनं कडाडून विरोध केला आहे. मात्र आता 2014 सारखी परिस्थिती नाही. कारण जैतापूर प्रकल्पाला सगळ्याच स्थानिकांचा विरोध होता. पण, यावेळी परिस्थिती वेगळी आहे.
नाणार प्रकल्पावरुन स्थानिकांमध्ये फूट पडली. त्यामुळे यंदा मतदारसंघाचा पूर्ण पाठींबा सेनेला मिळेलच असं नाही. मात्र राजन साळवींची जमेची बाजू म्हणजे अतिशय विखुरलेल्या छोट्याशा गावांमध्येही त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. भाचपचं या मतदारसंघातलं अस्तित्व नगण्य आहे. त्यामुळे राजन साळवींनाच युतीची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. राजापुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कोणीही मोठा चेहरा नाही. त्यामुळे तगडा विरोधक नसणं हे सेनेच्या पथ्यावर पडू शकेल.
