लांजातील राजकीय पुढाऱ्याला बेड्या, खवले मांजराची शिकार महागात पडली

0

रत्नागिरी : खवले मांजर यांची शिकार करुन खवल्यांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लांजा येथील एका राजकीय पुढाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. साटवली येथील हा पुढारी असुन पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी सापळा रचून ही कारवाई केली. साटवली येथील जितेंद्र सुरेश चव्हाण हा खवले मांजराची १० किलोची खवले घेऊन विक्री करण्यासाठी रुण फाटा येथे येणार असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग रत्नागिरी यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक रुण फाटा येथे गुरुवारी सायंकाळी दाखल झाले होते. गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकारी यांनी सापळा रचून रचला. जितेंद्र चव्हाण हा रुण फाटा येथे आल्यानंतर तो कोणत्या ग्राहकांला विक्री करणार आहे याची देखील वाट पहात बसले होते. मात्र बराच वेळ झाला तरी खवले विकत घेणारा आला नसल्याने जितेंद्र हा निघून जाईल व रचलेला सापळा फसेल म्हणून गुन्हा अन्वेषण विभागाने जितेंद्र चव्हाण याला धाड टाकून सायंकाळी ६ वा. ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता खवल्या मांजराची १० किलो वजनाची खवले आढळून आली. गुन्हा अन्वेषण विभागाने जागेवर पंचनामा करुन रात्री लांजा पोलीस स्थानकात येवून जितेंद्र चव्हाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पीएसआय विकास चव्हाण, एएसआय माने, पोलीस कॉन्स्टेबल बागणे, डोमणे, झोरे ,बागुल ,पी. ऐन. दरेकर, भोसले ,पालकर, पोलीस कॉन्स्टेबल दत्ता कांबळे यांनी कारवाई केली.

रत्नागिरी खबरदार
RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:41 AM 06/Nov/2020