मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याने मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र क्रांती सेनेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मानचिन्ह, शाल व तलवार देऊन सत्कार करण्यात आला. राज्यातील मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. तर सर्वोच्च न्यायालयात तो कायदेशिररित्या भक्कम राहावा, न्यायालयात हा कायदा टिकावा म्हणून चांगले वकील नेमले. त्यांच्या कार्यामुळे मराठा आरक्षणचा मुद्दा न्यायालयाच्या पातळीवर टिकवला आणि मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळाले. समाजातील मागासलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावल्याने हा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सर्वश्री प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, क्रांती सेनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, सरचिटणीस प्रणय सावंत, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष भरत पाटील, वंदना मोरे, चंद्रकांत साहु, रवींद्र साळुंके, ठाणे जिल्हाध्यक्ष रमेश खामकर, मनोज पाटील आदी उपस्थित होते.
