फिरोज शाह कोटला स्टेडियमधील एका स्टॅण्डला विराट कोहलीचे नाव

0

नवी दिल्ली : दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने ( DDCA) गुरुवारी फिरोज शाह कोटला स्टेडियमचे नाव बदलून दिवगंत अरुण जेटली स्टेडियम असे केले. DDCAचे माजी अध्यक्ष असलेल्या जेटलींचे गेल्या महिन्यात निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून DDCAने फिरोज शाह कोटला स्टेडियमला त्यांचे नाव देण्याचे जाहीर केले आणि गुरुवारी मोठ्या थाटामाटात हा नामकरण सोहळा पार पडला. याच सोहळ्यात स्टेडियममधील एका स्टॅण्डला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव देण्यात आहे. 2001साली याच स्टेडियमवर भारतीय क्रिकेटपटूंच्या ऑटोग्राफसाठी कोहली धावाधाव करायचा आणि आज त्याच स्टेडियमवरील स्टॅण्डला कोहलीचे नाव देण्यात आले. कोहलीनं या सत्काराप्रसंगी DDCAचे आभार मानले. तो म्हणाला,”एवढी प्रमुख माणसं या सोहळ्याला उपस्थित असल्याचे पाहून दडपण आले होते. इतका भव्यदिव्य सोहळा मलाही अपेक्षित नव्हता. DDCAचे अध्यक्ष आणि संघातील उपस्थित सदस्यांचे आभार. दिल्लीचे सर्व माजी खेळाडू त्यांचेही आभार.” यावेळी कोहलीनं कोटला स्टेडियमशी संबंधित एक आठवण सांगितली. तो म्हणाला,”या सोहळ्यासाठी घर सोडताना मी कुटुंबीयांना 2001च्या एका प्रसंगाची आठवण करून दिली. 2001 साली येथे भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात कसोटी सामना खेळला गेला होता. आम्ही पेव्हेलियन स्टॅण्डच्या शेजारी बसलो होतो. युवराज सिंग, जवागल श्रीनाथ बाऊंड्रीवर क्षेत्ररक्षण करत होते. तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेलो मी त्यांच्याकडे ऑटोग्राफ मागत होतो. त्यावेळी कधी असा विचारही केला नव्हता की, त्याच स्टेडियमवरील स्टॅण्डला आपले नाव दिले जाईल.” 30 वर्षीय विराटच्या नावावार 20000 हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा आहेत. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10000 धावांचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here