भारताचं ‘चंद्रयान-२’ चंद्रावर सुखरूप पोहोचल्याचा ‘विक्रम’ ७ सप्टेंबरला होता-होता राहिला. विक्रम लँडर चंद्रापासून अवघा २ किलोमीटर दूर असताना त्याचा इस्रोशी संपर्क तुटला आणि संपूर्ण देश हळहळला. पण, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आणि भारतीयांनी आशा सोडलेली नाही. विक्रमशी संपर्क साधण्याचे इस्रोचे प्रयत्न सुरूच आहेत आणि अख्खा देश त्यांच्या पाठीशी उभा आहे. अशातच, सगळ्यांची उमेद वाढवणारी बातमी ‘नासा’कडून आली आहे. येत्या १७ सप्टेंबरला ‘नासा’चा ऑर्बिटर ‘विक्रम’च्या लँडिंग साईटवरून भ्रमण करणार आहे. त्यावेळी तो या ठिकाणची दृश्यं कॅमेऱ्यात टिपू शकतो आणि त्यात विक्रम लँडरच्या सद्यस्थितीचे काही फोटो इस्रोला मिळू शकतात.
