रेवस – रेड्डी सागरी महामार्ग केव्हा पूर्ण होणार ?

0

✍️ अॅड. विलास पाटणे

➡ 42 खाडयांनी व्यापलेल्या डोंगराळ प्रदेशाच्या कोकणपट्टीतून जाणारा 540 कि मि चा रेवस-रेड्डी सागरी महामार्गामुळे मुंबईचे सध्याचे अंतर 105 कि.मी. ने कमी होऊन प्रवासाची वेळ किमान 1 -1/2 तासांनी कमी होईल. कोकणातील बहुतांशी पर्यटन केंद्रे किनारपट्टीवर असल्याने पर्यटन विकासाला गती मिळून मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणात उतरतील. आंबा उत्पादन व मत्स्यव्यवसायाला अधिक गती मिळेल. राष्ट्राच्या संरक्षणाच्या दृष्टीने सागरी महामार्गाच महत्त्व अधिक आहे. सागरी महामार्ग हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे .1989 साली जेष्ठ पत्रकार माधवराव गडकरी यांच्या नेतृत्वाखाली दाभोळला परिषद घेतली .महामार्गावरील पुलांकरीता नितिन गडकरी यांचेकडे सातत्याने आग्रह धरला. युती सरकारमध्ये मा नितिजी गडकरी बांधकाम मंत्री असताना 7/8 पूल त्यानी मार्गी लावले.

दिघी -आगरदांडा, बाणकोट- बागमांडले , जयगड व दाभोळ हे पूल राष्ट्रीय ग्रामीण विकास बँकेकडे (नाबार्ड) प्रस्तावित आहेत. बाणकोट – बांगंमांडला पूल 2013 साली नाबार्डकडून अर्थसहाय्य मिळून देखील रखडला आहे. तसेच जयगड ऐवजी 10 कि.मी. अंतरावरील कुंडली, (जांभारी) पूल प्रस्तावित आहे. परंतू जयगडमध्ये पूल बांधणे सर्वार्थाने योग्य आहे. तसेच विजयदुर्ग ऐवजी सागवे आंबेरी पूर्ण झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत या पुलांना फेरीबोट हा पर्याय होवू शकत नाही. राष्ट्रीय महामार्गावर कधीही फेरीबोट बांधत नाहीत. फेरीबाटीमुळे जलद वाहतूकीस अडथळा येतो तसेच प्रवासाला वेळ लागतो. त्याचप्रमाणे या जेटींवर तराफ्याची वाट पाहण्यात 1/2 खर्ची पडतात. महामार्गावरील सर्वात मोठा पूल रेवस-कारंजा हा पूर्णपणे खाजगीकरणातून पूर्ण करणे हाच पर्याय शासनासमोर आहे. किरकोळ अपवाद वगळता सागरी महामार्ग किनारपट्टीनेच गेला पाहिजे. जयगड ऐवजी 17 कि.मी. अंतरावरील राई-भातगाव, दाभोळ ऐवजी 8 कि.मी. अंतरावरील प्रस्तावित साखरी त्रिशुळ (गुहागर) बाणकोट ऐवजी 25 कि.मी. वरील म्हाप्रळ पुलावरुन जाणा-या मार्गाला सागरी महामार्ग म्हणणे संयुक्तीक नाही.

2017 मध्ये रेवस-रेड्डी या 540 कि.मी. सागरी महामार्ग पूर्ण करणेची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग मंडळाने घेतली होती. त्यासाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. अशाप्रकारच्या पॅकेजनुसार 4 कंपन्यांशी डीपीआर होऊन सल्लागारांशी करारनामे पूर्ण झाले होते. परंतु कोरोनामुळे अनेक विकास प्रकल्पे अडचणीत आले. शेवटी दि. 23/10/2020 चे पत्राने सागरी महामार्ग पुन्हा महा. राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सुपुर्द करणेत आला आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील आरवली ते वाकेड हा 90 कि.मी. पूर्णपणे तसेच परशुराम ते आरवली हा 34.45 कि.मी. पैकी 27.45 रस्ता अपूर्ण आहे. सिंधुदुर्ग वगळता रायगडमधील परिस्थिती समाधानकारक नाही. एम.ई.पी. ऐवजी अॅन इन्फ्रा आणि चेतक ऐवजी ‘इगल’ या कॉन्ट्रॅक्टर कंपनीमार्फत तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. रिलायन्सला दिलेला कशेडी टनेलच्या 1.80 कि.मी. पैकी 1.30 कि.मी. काम प्रलंबित आहे. थोडक्यात सागरी महामार्ग निधीमुळे तर मुंबई-गोवा महामार्ग कॉन्ट्रॅक्टरमुळे रखडला आहे असाच निष्कर्ष काढावा लागेल. सागरी महामार्ग पूर्ण झाला तर तो कोकणच्या विकासाचा महामार्ग ठरेल.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:56 PM 10-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here