नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघाची न्यूयॉर्क येथे वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ते २७ सप्टेंबरदरम्यान अमेरिका दौर्यावर जाणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून शुक्रवारी (ता.१३) देण्यात आली. अनेक देशांसमवेत द्विपक्षीय बैठकांचे आयोजन या काळात करण्यात आले असून या बैठकांतही मोदी सामील होणार आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक बैठकीत २७ तारखेला सकाळी मोदी यांचे भाषण होणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची ही ७४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. केंद्रात रालोआ २.० सरकार सत्तेत आल्यानंतरचे संयुक्त राष्ट्रसंघातले मोदी यांचे हे पहिलेच भाषण असणार आहे. मोदी यांच्या भाषणानंतर काही वेळातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे भाषण होणार आहे. काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्रसंघात गरळ ओकण्याचे संकेत याआधीच पाकिस्तानकडून देण्यात आले आहेत. २४ तारखेला संयुक्त राष्ट्रसंघ मुख्यालयात इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिलतर्फे लिडरशीप मॅटर्स, रिलिव्हन्स ऑफ गांधी इन दि कंटेम्पटरी वर्ल्ड या विषयावर परिसंवाद होणार असून यात मोदी सहभाग घेतील. याशिवाय ह्युस्टन येथे होणार्या अमेरिकन भारतीयांच्या कार्यक्रमातही ते सामील होणार असल्याचे रवीश कुमार यांनी नमूद केले.
