कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसताना दंत चिकित्सा करणार्या घुलेवाडी येथील एका बोगस वैद्यकीय व्यवसाय करणारा ‘मुन्नाभाईं’ला पकडले. त्याचबरोबर त्याचा दवाखाना तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश घोलप यांनी कायमस्वरूपी सील केला. यामुळे बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचे करण्याचे आदेश तालुका आरोग्य अधिकारी आणि ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार संगमनेरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप कचेरिया यांनी संगमनेर परिसरात वैद्यकीय व्यवसाय करणार्यांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली.
घुलेवाडीतील फ्लोरा टाऊनशीपमध्ये असलेल्या बापू शेळके या बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या मुन्नाभाईच्या दवाखान्यावर वैद्यकीय पथकाने छापा टाकून आवश्यक कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यात बापू महादू शेळके या बोगस डॉकटरकडे दंतवैद्य व्यवसायाचे कोणतेही शासकीय प्रमाणपत्र अगर शिक्षणाचे प्रमाणपत्र नसताना तो बेकायदेशीरपणे कृत्रिम दात बनविण्याचा व्यवसाय करीत होता. पथकाने त्याच्या दवाखान्यातील कृत्रिम दात बनविण्याचे साहित्य जप्त केले.
याबाबत संगमनेर पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश घोलप यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी मुन्नाभाई बापू महादू शेळके विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांस सीआरपीसी 41 प्रमाणे कायदेशीर नोटीस बजावली आहे. या कारवाईने शहरात कार्यरत असलेल्या मुन्नाभाईंच्या कंपूत एकच खळबळ उडाली आहे