नवी दिल्ली : देशांतील ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक असलेल्या आणि देशाची शान असलेल्या राजधानी दिल्लीमधील सरकारी वास्तुंची पुर्नरचना केली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती, पण केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दुजोरा दिल्यानंतर या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले. पुरी यांनी आज (ता.१३) एका कार्यक्रमामध्ये संसद भवन आणि सेंट्रल व्हिस्टाचा पुर्नरचना करण्याची माहिती दिली. केंद्र सरकारच्या या मेगा योजनेचा आगामी वर्षापासून प्रारंभ होऊ शकतो. येत्या पाच वर्षामध्ये देशाला नुतन संसद भवन मिळू शकते. गेल्या काही दिवसांपासून संसद भवन पुर्नरचना तसचे सर्व मंत्रालयांना एकाच छताखाली आणण्यासाठी चर्चेने उचल खाल्ली होती. एडविन ल्युटन्सने राष्ट्रपती भवनापासून ते इंडिया गेटपर्यंतची रचना केली होती. आता संसद प्रांगणातील चार किलोमीटर परिसराचा पुर्नविकास करण्यासाठी नवीन प्लॅन तयार केला जात आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्व मंत्रालये एकाच छत्राखाली येणार आहेत. आणि विशेष बाब म्हणजे सर्व मंत्रालये थेट पीएमओशी LIVE असतील. या मेगा योजनेतून केंद्र सरकार राजपथ, संसद भवन आणि सचिवालय इमारतींची पुर्नरचना करणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या इमारती १९११ ते १९३१ या कालावमधीमध्ये बांधून पूर्ण झाल्या आहेत. म्हणजेच ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये या इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे या इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्याचबरोबर दक्षिण आणि उत्तर ब्लॉक भुकंपरोधक नाही. कार्यालयीन परिसर, पार्किंग तसेच अन्य सुविधांसाठी ही जागा अपूरी पडू लागली आहे.
