देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील किरडुवे येथे विहिरीत पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा बूडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. याबाबत देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल अनंत पांचाळ (वय 34) व संजय काशिनाथ बाईत (30, दोघेही रा. किरडुवे) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही वाडीतील विहिरीत शुक्रवारी दुपारी पोहायला गेले होते. पोहत असताना स्वप्निल विहिरीच्या पाण्यात बुडाला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला संजय हासुद्धा पाण्यात बुडाला. ही बाब ग्रामस्थांना समजताच विहिरीकडे धाव घेतली. देवरूख पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर ग्रामस्थांनी दोघांना पाण्याबाहेर काढून देवरूख ग्रामीण रुग्णालयात आणले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
