रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधातील अविश्वासाचे ‘वादळ’ आता अटळ आहे. शुक्रवारी जि. प. भवनात दिवसभर ‘सही दे सही’ हे नाट्य रंगले होते. सेनेच्या सर्व सदस्यांची स्वाक्षरी घेऊन अविश्वास ठरावाबाबतचे निवेदन सायंकाळी जि. प. अध्यक्षांकडे सादर करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पदाधिकारी, सदस्य यांच्यातील संघर्षाचे ग्रहण सुटता सुटेना झाले आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या विरोधात झालेला संघर्ष सर्वश्रुत असताना आता आंचल गोयल यांच्या विरोधातही असाच संघर्ष सुरू झाला आहे. ग्रामीण विकासाचे केंद्रबिंदू म्हणून तसेच मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये नेहमीच काहीतरी विषय चर्चेत असतो. सध्या चर्चेचा विषय ठरला आहे तो मुख्य कार्यकारी अधिकारी विरूद्ध पदाधिकारी, सदस्य यांच्यातील संघर्ष. गेल्या सर्वसाधारण सभेत याची ठिणगी उडाली. यावेळी अविश्वास ठराव टाकण्याचा इशाराही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आला होता. चार दिवसांपूर्वी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीवरून संघर्ष तीव्र बनला आहे. 197 शिक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या. याला पदाधिकार्यांनी आक्षेप घेत तसे पत्रही मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिले होते. मात्र या पत्राला केराची टोपली दाखवून अवघ्या एका तासातच 197 बदल्या केल्या. यानंतर शिवसेनेचे सर्व सदस्य आक्रमक बनले. आ. उदय सामंत व जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी यामध्ये लक्ष घालत अविश्वास ठरावासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. लवकरच अविश्वास ठराव टाकू, असे यावेळी सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी दिवसभर सेनेच्या सर्व सदस्यांना जि. प. भवनात बोलावण्यात आले. या अविश्वास ठरावाच्या निवेदनावर स्वाक्षरी घेण्याचे काम सुरू होते. सायंकाळी 5 वाजता 38 सदस्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन अध्यक्ष स्वरूपा साळवी यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष संतोष गोवळे, बांधकाम व आरोग्य सभापती विनोद झगडे, सदस्य उदय बने, संतोष थेराडे, बाळकृष्ण जाधव, बाबू म्हाप आदी उपस्थित होते. यानंतर हे निवेदन सामान्य प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्याकडे देण्यात आले आहे. यानंतर आता पुढील कार्यवाही होईल.
