रत्नागिरीच्या राजांना जल्लोषात निरोप

0

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर सर्कल येथील श्री रत्नागिरीचा राजा व आठवडा बाजारातील रत्नागिरीचा राजाचे विसर्जन शुक्रवारी रात्री मांडवी समुद्रकिनारी करण्यात आले. सायंकाळी 4 वाजल्यापासून निघालेली मिरवणूक तब्बल 6 तासांहून अधिक काळ रंगली. गुलालाची उधळण, ढोल-ताशांच्या दणदणाटाने रंगलेल्या शहरातील दोन्ही राजांच्या मिरवणुका पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. जंगी मिरवणुकीमुळे एसटी स्थानकापर्यंत वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून सुरू झालेला या सार्वजनिक गणेशोत्सवाची शुक्रवार, दि. 13 सप्टेंबर रोजी सांगता झाली. दरम्यान, गुरुवारी अनंत चतुर्दशी दिनी गणेशोत्सवाची सांगता झाल्याने आबालवृद्ध नागरिकांनी शुक्रवारी दोन्ही राजांच्या नयनरम्य मिरवणुका पाहण्यासाठी गर्दी केली होती. माळनाका येथे मिरवणूक व श्रीरत्नागिरीच्या राजावर भाविकांनी स्कायवॉकवरुन पुष्पवृष्टी केली. श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक  मंडळाच्या राजाची दुपारी आरती, गार्‍हाणे झाल्यानंतर सजवलेल्या ट्रॅक्टरवर बाप्पांची मूूर्ती विराजमान झाली. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीचा राजा आठवडाबाजार येथून सवाद्य मिरवणुकीने निघाला. राम आळीमार्गे मांडवीपर्यंत मिरवणूक पुढे निघाली. प्रचंड गर्दी, ढोल-ताशा पथके, झांजपथके, गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीने भाविकांचा उत्साह पहायला मिळाला. ‘रत्नागिरीचा राजा’ची देखणी व भव्य गणेशमूर्ती पाहण्यासाठी भाविकांची रिघ लागली होती. ‘गणपती बाप्पा मोरया,  पुढच्या वर्षी लवकर’ या अशा जयघोषात दोन्ही राजांना मांडवी किनारी  जमलेल्या हजारो  भाविकांनी निरोप दिला. रत्नागिरी जिल्ह्यात यंदा 1,67,866 घरगुती गणपतींची तर 111 सार्वजनिक गणपतींची स्थापना करण्यात आली होती. त्यापैकी 9968 घरगुती आणि 2 सार्वजनिक गणपतींचे दीड दिवसांनी, 2398 घरगुती आणि 2 सार्वजनिक गणपतींचे पाच दिवसांनी, तर 1,16,020 घरगुती आणि 17 सार्वजनिक गणपतींचे गौरी बरोबर विसर्जन करण्यात आले. वामन द्वादशीला 2829 घरगुती आणि 8 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले. अनंत चतुर्दशीला 36,316 घरगुती आणि 64 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here