मालवण : निवती-भोगवे येथील समुद्रात मासेमारी करणार्या मालवण-दांडी मोरेश्वरवाडी येथील पातीला (नौका) समुद्राच्या अजस्र लाटांनी तडाखा दिल्याने ‘मोरेश्वर प्रसाद’ ही पात उलटून इंजिनसह जाळ्यांचे दोन लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले. सुदैवाने पात मालक राजन भगत यांच्या कुटुंबातील चारही जण बचावले. ही घटना शुक्रवारी सकाळी 6 वा. च्या सुमारास निवती-भोगवे समुद्रात किनार्यापासून चार ते पाच वाव अंतरावर घडली. दांडी-मोरेश्वरवाडी येथील राजन राधाकृष्ण भगत हे आपली ‘मोरेश्वर प्रसाद’ पात घेऊन शुक्रवारी पहाटे 4 वा.च्या सुमारास निवती-भोगवे समुद्रात मच्छीमारीसाठी गेले होते. त्यांच्या समवेत त्यांचे मुलगे मनीष, गणेश, तसेच काका शिवलिंग भगत हे होते. निवती-भोगवे समुद्रात त्यांनी पापलेट मासळीसाठी जाळी पसरली. त्यानंतर सुमारे दोन तासांच्या कालावधीनंतर सकाळी 6 वा. च्या सुमारास अचानक समुद्रात मोठी लाट उसळून तिचे पाणी पातीत घुसले. लाटेच्या दणक्याने पात उलटी पडल्याने पातीवरील चारही जण समुद्रात बाहेर फेकले गेले. त्यांनी प्रसंगावधान राखत पातीला हाताने घट्ट पकडून ठेवले. दरम्यान समुद्रात आलेल्या. पुन्हा उसळलेल्या एका मोठ्या लाटेने पातीसह चारही जणांना समुद्र किनार्यावर फेकून दिले. दरम्यान ही दुर्घटना पाहून समुद्र किनार्यावर आलेल्या स्थानिक मच्छीमारांनी दांडी येथील सुंदर चांदेरकर यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती देली. तसेच त्यांना पातीची नवीन मशिनरी घेऊन निवती येथे बोलावले. नवीन मशीन त्या पातीला बसवून सकाळी 9 वा. च्या सुमारास हे चारही मच्छीमार पातीसह मालवण दांडी येथे आले. समुद्रात पारंपरिक मच्छीमारांवर मत्स्य संकट उद्भवले असताना आपली रोजीरोटी कमविण्यासाठी पारंपरिक मच्छीमार नजीकच्या समुद्रात मासेमारी करतात परंतु अशा घडणार्या दुर्घटनांमुळे पारंपरिक मच्छीमार संकटात सापडला आहे.
