खेड : ज्यांना जायचे असेल त्यांनी प्रथम पदाचा आणि नंतर पक्षाच्या पदाचा राजीनामा द्यावा. जाणार्यांनी जनतेचा विश्वासघात करू नये. शरद पवार साहेबांना मानणारे कार्यकर्ते पक्षासोबत आहेत, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी स्पष्ट केले आहे. गुरुवारी (दि. 12) राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी तालुकाध्यक्ष सखाराम कदम, जि. प. सदस्या नफिसा परकार, जलाल राजपुरकर, सवेणीचे सरपंच मुख्तार कावलेकर, प्रकाश मोरे, अमित कदम आदी उपस्थित होते. यावेळी जाधव म्हणाले, दोन दिवसांपूर्वी आ. भास्कर जाधव यांनी सेनेत जाण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी त्यांनी हा चुकीचा निर्णय घेतला आहे. ज्यांना पक्षाने भरभरून दिले ते असा निर्णय का घेत आहेत हे अद्याप समजलेले नाही. मात्र, जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष संघटना मजबूत असून त्यांच्यासोबत कोणीही जाणार नाही, असे जाधव म्हणाले. आ. जाधव यांनी सेनेत जाण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून दुःख झाले. ते पक्ष का सोडत आहेत याचे कारण अद्याप समजलेले नाही. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. ते सांगत आहेत तेवढे राष्ट्रवादीचे जि. प. सदस्य त्यांच्यासोबत जाणार नाहीत. गुहागर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार निश्चितीबाबत बोलताना ते म्हणाले, पक्षाकडे काही कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. आगामी निवडणुकीत जिल्ह्यातील चार पैकी दोन विधानसभा मतदारसंघात भंडारी, कुणबी किंवा मुस्लिम समाजातून उमेदवारी देण्यात येणार आहे. लवकरच उमेदवार जाहीर करण्यात येतील. दापोलीत आ. संजय कदम चांगले काम करत आहेत. निवडणुकीत जिल्ह्यातील तीन आमदार राष्ट्रवादीचे निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
