बजरंग, विनेश, राहुल आवारेच्या कामगिरीकडे नजरा

0

नूर सुल्तान (कझाकिस्तान) : भारताचे आघाडीचे मल्ल शनिवारपासून सुरू होणार्‍या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणार असून, चांगल्या कामगिरीसोबतच टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी बजरंग पुनिया व विनेश फोगाट यांनी चांगली कामगिरी केली आहे. महाराष्ट्राचा राहुल आवारेदेखील चांगली कामगिरी करीत ऑलिम्पिक  तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करेल. बजरंगने या सत्रातील डॅन कोलोव, आशियाई अजिंक्यपद, अली अलीव व यासर डोगू स्पर्धेत विजय मिळवले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 65 किलो वजनीगटात तो जगातील अव्वल मानांकित मल्ल म्हणून मॅटवर उतरेल. विनेश नवीन वजनीगटात सहभाग नोंदवणार असून, ती 50 वरून 53 वजनीगटात सहभागी होईल. तिने वजनीगटात समतोल साधण्यासाठी काही वेळ घेतला; पण तिने पाच फायनलपर्यंत मजल मारत यासर डोगू, स्पेन ग्रां.प्री. व पोलंड ओपनमध्ये जेतेपद मिळवले. विनेशसाठी कौशल्य हा मुद्दा नसून, प्रतिस्पर्धी स्पर्धकाला सहा मिनिटे रोखून ठेवण्याचे आव्हान असणार आहे. गेल्या वर्षी दुखापतीमुळे बुडापेस्ट चॅम्पियनशिपमधून तिला बाहेर पडावे लागले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कोणत्याच महिला स्पर्धकाने सुवर्णपदक जिंकले नाही व विनेशकडे ते करण्याची संधी आहे. बजरंग आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून, त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. सुशीलकुमारने भारताला पुरुषांच्या फ्री स्टाईलमध्ये जेतेपद मिळवून दिले आहे.25 वर्षीय या मल्लाने दोन जागतिक अजिंक्यपद पदके मिळवले आहेत; पण त्याला सुवर्णपदक जिंकता आलेले नाही. मात्र, जेतेपद मिळवण्यासाठी त्याला रशियाच्या गदजिमुराद राशिदोव व बहरिनच्या हाजी मोहम्मद अली यांचा सामना करावा लागेल. दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता सुशीलकुमार आठ वर्षांनंतर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग नोंदवत आहे. 74 किलो वजनीगटात तो सहभाग नोंदवणार आहे. सुशीलप्रमाणे रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती साक्षी मलिक सहभागी होईल.2017 सालची राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्यानंतर तिने कोणताच किताब जिंकलेला नाही. दुसरीकडे दिव्या काकरानने दोन सुवर्ण व तितक्याच कांस्यपदकांची कमाई केली. पूजा ढांडाने गेल्या वर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकले होते. त्यामुळे तिच्याकडूनही अपेक्षा आहेत. पुरुषांच्या फ्री स्टाईलमध्ये दीपक पुनिया उलटफेर करण्यासाठी सक्षम आहे. त्याने ट्रायलमध्ये वरिष्ठ मल्लांना मागे टाकले. वरिष्ठ गटात चमक  दाखवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. गुरप्रीत सिंह (77 किलो) व हरप्रीत सिंह (82 किलो) यांच्याकडून ग्रीको रोमन गटात अपेक्षा आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here