रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांसाठी मानाचा व प्रतिष्ठेचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अविश्वास ठरावाचे सावट दिसून आले. शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठरल्याप्रमाणे बहिष्कार टाकला होता तर पदाधिकाऱ्यांनी सीओंच्या विरोधात बोलण्याची मोहीमच उघडली असल्याचे चित्र दिसन आले. जि.प.शामराव पेजे सभागृहात पार पडलेल्या या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या विरोधात पदाधिकारी बोलताना दिसले. गेल्या काही दिवसांपासून मुख्य कार्यकारी अधिकारी विरूद्ध पदाधिकारी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. हा संघर्ष अजूनही सुरू असून, अविश्वास ठरावापर्यंत जाऊन पोहोचला आहे. या कार्यक्रमातही अविश्वास ठरावाचे सावट असल्याचे वारंवार दिसून आले. शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी तर मुख्य कार्यकारीर अधिकाऱ्यांच्या कारभाराचा चांगलाच समाचार घेतला. आमच्या जिल्ह्याचे नाव बदनाम करून जाऊ नका, असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्याचबरोबर संतोष थेराडे यांनीसुद्धा कारभारावर टीका केली. भांडणे केल्याशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नाही. ही भांडणे करण्याची वेळ प्रशासनाने आणली आहे. आडमुठे धोरणामुळे तसेच मी पणा येत असल्यामुळे अनेक कामे खोळंबली असल्याचे थेराडे यांनी सांगितले.
