रत्नागिरी : तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीच्या सभेत गोंधळ घातल्यामुळे पोलीस स्थानकात केलेल्या तक्रारीचा राग मनात ठेवून गणेश विसर्जन मिरवणूक सुरु असताना गणेशगुळे सरपंच संदीप शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तडीपार गुंड राकेश चंद्रकांत नागवेकर याला मध्य रात्री दोन वाजण्याच्या सुमारास गणेशगुळे नजिकच्या जंगलातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत चतुर्दशीची गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना तालुक्यातील गणेशगुवे येथे सरपंच संदीप शिंदे यांच्यावर राकेश नागवेकर यांने कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला केला होता. गणेशगुळे सरपंच संदीप शिंदे हे गुरुवारी रात्री गावातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी मिरवणूकीत आलेल्या राकेश नागवेकर याने पूर्ववैमनस्यातून संदीप शिंदे यांच्यासोबत वाद घातला होता. त्यानंतर काहीवेळ वाद सुरू असतानाच अचानक राकेशने कोयत्याने संदीप शिंदे यांच्या मानेवर सपासप वार केले. त्यानंतर तो नजिकच्या जंगलात पळून गेला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संदीप शिंदे यांना ग्रामस्थांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. जंगलात पळून गेलेल्या राकेशच्या शोधासाठी पोलीसांनी रात्रभर नजिकचे जंगल पालथे घातले, उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरिक्षक श्री.सुरेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार किशोर धातकर, पो. ना. रामा वडार, महेश गुरव, प्रकाश झोरे, विजय ईदाते यांनी राकेशला अटक केली आहे. राकेश नागवेकर याच्या विविध गुन्हे दाखल असल्याने त्याला उपविभागिय अधिकाऱ्यांनी तडीपार केले होते. त्यानंतर त्याच्या तडिपारीला आयुक्त कार्यालयाकडून स्थागिती मिळाली होती. त्यानंतर राकेश गावी आला होता. काही दिवस तो शांत होते. मात्र गावातील ग्रामसभेत तंटामुक्त अध्यक्ष निवडीच्या सभेत त्यांने गोंधळ घातल्याने सरपंच संदीप शिंदे यांनी राकेशविरुद्ध भा. दं. वि. कल ३५३ नुसार गुन्हा दाखल केला होता.
