रत्नागिरी : शहरातील शिवाजी स्टेडीयम येथील ११ गाळयांचा नियमबाह्य वापर सुरू आहे. या गाळ्यांची मुदत तीन वर्षांपूर्वीच संपुष्टात आली आहे. गाळे ताब्यात न घेता त्याचा वापर सुरू असून रनप प्रशासन या गाळ्यांचे नियमबाह्य पध्दतीने भाडे भरून घेत आहे. यामुळे संबंधितांना नोटीस काढून गाळे सील करा, असे आदेश प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी पालिका प्रशासनाला दिले. रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नगरसेवक निमेश नायर यांनी विषयपत्रिकेवरील विषयांवर चर्चा सुरू होण्यापूर्वीच सुरवातीलाच हा विषय मांडला. शिवाजी क्रीडांगण येथील ११ गाळ्यांची मुदत तीन वर्षांपूर्वी संपली आहे. तरी पालिकेने हे गाळे का ताब्यात घेतलेले नाहीत. गाळेधारक अजून भाडे भरत आहेत आणि पालिका कसे भाडे भरून घेत आहे. त्यांना मुदतवाढ दिली आहे का, असा प्रश्न विचारला. याबाबत नगराध्यक्ष साळवी यांनी माहिती मागविली. तेव्हा राष्ट्रवादीचे गटनेते सुदेश मयेकर म्हणाले, पालिकेच्या मालकीचे हे गाळे आहेत. त्यामुळे ताब्यात घेण्याबाबत कुणाला विचारण्याची काही गरज नाही. माहिती घेतल्यानंतर नगराध्यक्ष साळवी म्हणाले, आजच याबाबतची कार्यवाही करा. नोटीस काढून सोमवारपर्यंत हे गाळे सील झाले पाहिजेत. ताब्यात घेऊन त्यांचे त्रिसदस्यांकडून मुल्यांकण करून पुढील प्रक्रिया करण्याच्या सूचना दिल्या. शहरातीला दुभाजकाच्या दर्जाबाबत भाजपचे नगरसेवक समिर तिवरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. जे दुभाजक बांधण्यात आले आहेत. त्यांची खोदाई दहा इंच होती, ती झालेली नाही. त्यामध्ये ६ हजार ६०० झाडे लावायची होती. ती लावली गेली नाहीत. पाऊण इंची पाईप लाइन टाकलेली नाही. एकूणच ठेकेदाराने या कामाचा दर्जा ठेवलेला नाही, असा आरोप केला. करारपत्राप्रमाणे जर काम झाले नसेल तर ठेकेदाराला पुढील बिल देता येणार नाही, असे सांगण्यात आले.
