राजापूर : ग्रामसेवकांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत आंदोलनामुळे गेल्या महिनाभरापासून ग्रामपंचायतींचा कारभार रखडला आहे. ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीमध्ये ग्रामपंचायतीचा कारभार हाकायचा कसा, असा प्रश्न सरपंचांपुढे पडला आहे. विविध मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी बेमुदत आंदोलन पुकारले आहे.आंदोलनावर जाण्यापूर्वी ग्रामसेवकांनी त्यांच्या ताब्यात असलेले ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाजाचे दप्तर आणि चाव्या पंचायत समिती प्रशासनाकडे जमा केल्या आहेत. विविध शासकीय कामकाजासाठी ग्रामपंचायतीकडून विविध प्रकारचे दाखले दिले जातात. मात्र, ग्रामसेवकच ग्रामपंचायतीमध्ये | नसेल तर हे दाखले देणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वातंत्र्यदिनी आयोजित करण्यात आलेल्या अनेक ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा गण संख्येअभावी तहकूब करण्यात आल्या होत्या. त्या ग्रामसभा गत महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घेण्यात आल्या. या ग्रामसभांमध्ये गाव विकासाच्या अनुषंगाने निर्णय घेताना आवश्यक असलेली प्रशासकीय माहिती ग्रामसेवक देऊ शकतात. मात्र, ग्रामसेवकच आंदोलनामध्ये असल्याने ती माहिती देणार कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या कामाची निविदा प्रसिद्ध करणे, झालेल्या कामाचे बिल अदा करणे, विविध प्रकारचे दाखले देणे आदी कामेही ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे रखडली आहेत. अशा स्थितीत गावचा कारभार कसा चालवायचा, असा प्रश्न गावच्या सरपंचांपुढे पडला आहे. या साऱ्याचा विचार होऊन शासनाने ग्रामसेवकांबाबत वेळीच योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.
