नवी दिल्ली : अर्थ आणि परराष्ट्र विषयावरील संसदेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी आतापर्यंत काँग्रेसचे खासदार होते. पण या समित्यांची फेररचना करताना केंद्र सरकारने दोन्ही समित्यांच्या अध्यक्षपदी भाजप खासदारांना नेमले आहे. अर्थविषयक स्थायी समिती अध्यक्षपदी जयंत सिन्हा यांची तर परराष्ट्रविषयक स्थायी समितीच्या अध्यक्षपदी पी. पी. चौधरी यांची नेमणूक करण्यात आली आहे. याआधी या समित्यांच्या अध्यक्षपदी क्रमशः काँग्रेसचे वीराप्पा मोईली आणि शशी थरुर हे होते. गत लोकसभा निवडणुकीत वीराप्पा मोईली यांना पराभव पत्करावा लागला होता. तर, शशी थरुर यांनी केरळमधील तिरुवअनंतपूरम मतदारसंघातून विजय मिळवला होता. शशी थरुर यांना परराष्ट्रविषयक स्थायी समिती अध्यक्षपदावरुन हटविण्यात आले असले तरी माहिती तंत्रज्ञानविषयक स्थायी समितीच्या अध्यक्षपदी त्यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे आधी परराष्ट्रविषयक समितीत सदस्य होते. त्यांची बदली आता संरक्षणविषयक स्थायी समितीत सदस्य म्हणून करण्यात आली आहे. संरक्षणविषयक समितीचे अध्यक्ष जुएल ओराम हे आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन हे याआधी परिवहन, पर्यटन आणि संस्कृतीविषयक स्थायी समितीचे प्रमुख होते, त्यांना हटविण्यात आले असून याजागी अलिकडेच भाजपमध्ये आलेल्या टी. जी. वेंकटेश यांना संधी देण्यात आली आहे. डेरेक ओ ब्रायन यांना मनुष्यबळ विकासविषयक समितीत सदस्य म्हणून नेमण्यात आले आहे. भाजपचे सत्यनारायण जटिया हे या समितीचे अध्यक्ष आहेत.
