कोलंबो : भारताच्या १९ वर्षाखालील संघाने कोलंबो येथे झालेल्या रोमहर्षक सामन्यात बांगलादेशचा अवघ्या ५ धावांनी पराभव केला. याबरोबरच भारताने आशिया कपवर आपले नाव कोरले. या विजयाचा शिल्पकार मुंबईचा डावखुरा फिरकी गोलंदाज अथर्व अंकोलेकर ठरला त्याने अवघ्या २८ धावा देत ५ विकेट घेतल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला फक्त १०६ धावाच करता आल्या होत्या. अथर्वच्या भेदक माऱ्यामुळे भारताने बांगलादेशचा १०१ धावातच खुर्दा उडाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा डाव १०६ धावातच आटोपला. भारताकडून कर्णधार ध्रुव जुरेलने ३३, करण लाल ३७ तर शाश्वत रावत १९ धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजांना दुहेरी आकडाही पार करता आला नाही. बांगलादेशकडून मिरतूनजॉय चौधरी आणि शमीम हुसैन यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. भारताच्या १०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. फास्ट बॉलर आकाश सिंग समोर एक एक फलंदाज माघारी परतत होता. त्यानंतर कर्णधार अकबर अलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण, त्याला अथर्वने २३ धावांवर बाद करत बांगलादेशला मोठा धक्का दिला. यानंतर अथर्वने येणाऱ्या बांगलादेशी एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकू दिले नाही. अखेर अथर्वच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेश १०१ धावात ढेर झाला. अथर्वने ८ षटकात २८ धावा देत ५ विकेट घेतल्या तर आकाश सिंगने ३ विकेट घेत अथर्वला चांगली साथ दिली. फायनलच्या सामन्याचा हिरो ठरलेल्या अथर्व अंकोलेकरला सामनावीराचा तर भारताचाच सलामीवीर अर्जुन आजादला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
