नवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांची हरियाणा क्रीडा विद्यापीठाचे पहिले कुलपती म्हणून निवड करण्यात आली आहे. हरियाणा सरकारचे क्रीडामंत्री अनिल विज यांनी ही घोषणा केली. याबाबत क्रीडामंत्री अनिल विज यांनी ट्विट करून याची माहिती दिली. १९८३ चा क्रिकेट विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव यांच्या नावाची चर्चा विद्यापीठाच्या कुलपती पदासाठी सुरुवातीपासूनच होती. त्यांच्या नावावर अखेर हरियाच्या क्रीडामंत्र्यांनी शिक्कामोर्तब करत त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली आहे. हरियाणा क्रीडा विद्यापीठ हे सोनेपट जिल्ह्यातील राय गावात स्थापन करण्यात आले आहे. पूर्वी ते स्पोर्ट्स स्कूल होते, जे आता क्रीडा विद्यापीठात रूपांतरित झाले आहे. हरियाणा क्रीडा विद्यापीठ हे सोनेपट जिल्ह्यातील राय गावात स्थापन करण्यात आले आहे. पूर्वी ते स्पोर्ट्स स्कूल होते, जे आता क्रीडा विद्यापीठात रूपांतरित झाले आहे. हे देशातील तिसरे क्रीडा विद्यापीठ आहे. यापूर्वी, गुजरात (स्वर्णिम गुजरात स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी) आणि चेन्नई (तामिळनाडू शारीरिक शिक्षण व क्रीडा विद्यापीठ) मध्ये क्रीडा विद्यापीठांची स्थापना झाली आहे. माजी अष्टपैलू कपिल देव यांनी भारतीय संघासाठी १३१ कसोटी आणि २२५ एकदिवसीय खेळले आहेत. त्यांनी कसोटीत ५२४८ आणि वनडेमध्ये ३७८३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर, कपिल देव यांच्यानावावर कसोटी क्रिकेटमध्ये ४३४ आणि वनडे क्रिकेटमध्ये २३३ बळी घेण्याचा विक्रम नोंदविला आहे.
